कबड्डी स्पर्धेत पुणे विभाग अजिंक्य | पुढारी

कबड्डी स्पर्धेत पुणे विभाग अजिंक्य

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देहूरोड येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक एकमध्ये 17 वर्षे वयोगटाखालील मुलींच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुणे विभागाच्या मुलींच्या संघाने नाशिक विभागाच्या संघाला 30-16 असे पराभूत करून विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत पुणे, नाशिक, नागपूर व मुंबई विभागांनी आपला सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ निवडला जाणार आहे.

ही स्पर्धा सुपरलीग पध्दतीने खेळविण्यात आली होती. स्पर्धेत यजमान पुणे विभागाच्या मुलींच्या संघाने नाशिक विभाग संघावर सुरुवातीपासूनच वेगवान व आक्रमक खेळ करीत दबाव टाकला होता, त्याचा फायदा त्यांना झाला. मध्यंतराला पुणे विभागाकडे 16- 9 अशी आघाडी होती. पुणे संघाने मध्यंतरापूर्वी 3 बोनस व मध्यंतरानंतर 2 बोनग गुण वसूल केले होते. मध्यंतरानंतर एक लोनदेखील लावला. त्यामुळे सामन्यावर पुणे विभागाने आपली पकड घट्ट केली होती. पुणे विभागाच्या सानिक्षा भोसले व रंजिता घसारी यांनी चौफेर चढाया करीत आपल्या संघाला विजयाकडे नेले.

 

Back to top button