चंद्रपुरात १५ वर्षीय मुलाचा डबक्यात बुडून मृत्यू | पुढारी

चंद्रपुरात १५ वर्षीय मुलाचा डबक्यात बुडून मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील लालपेठ परिसरातील डबक्यात बुडून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.२) दुपारी दीडच्या सुमारास घडली. तनवीर शेख रहमान (वय १५) असे या मुलाचे नाव असून तो मेजर गेट दुर्गापूर येथील निवासी होता.

याबाबत अधिक माहिती अशी, तनवीर हा आर्यन साईनाथ यलगमवार (वय १६, रा. दादमहल) कृष्णा जितेंद्रकुमार साहू (वय १६, रा.भिवापूर) व सकलेन हमीद खान पठाण (वय २०, भिवापूर) या मित्रांबरोबर लालपेठ जवळील बंकरजवळ गाडी धुण्यासाठी गेला होता. याच्यालगत असलेल्या वनविभागाच्या डबक्यात तनवीर पोहण्यासाठी गेला होता. तनवीरसोबत आर्यन व कृष्णा हे दोघेही डबक्यात उतरले. येथील गार्डने त्यांना डबक्यात जाण्यास मज्जाव केल्याने आर्यन व कृष्णा दोघे परत आले. मात्र, तनवीर बाहेर आला नाही. त्यामुळे तिघे घाबरले. त्यांनी लगतच्या नागरिकांना मदतीसाठी बोलाविले. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. शहर पोलिसांनी तनवीरचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाला पाचारण केले. तब्बल २ तासांनी पोलिसांच्या बचाव पथकाला तनवीरचा मृतदेह शोधून काढण्यात यश आले. तनविरचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर कुटुंबियानी केलेला टोहो काळीज पिळवटून टाकणारा होता. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.

याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम नायगामकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी त्या डबक्याबाबत माहिती दिली की, त्याठिकाणी गवत विकास केंद्र सुरू होणार होते. मात्र, काही दिवसांपूर्वी तो प्रकल्प रखडला. त्या प्रकल्पासाठी वनविभागाच्या जागेवर आम्ही काम केले. आता त्याच ठिकाणी भारत माता प्रकल्प सुरू होत आहे. ज्या खड्ड्यात तनवीरचा मृत्यू झाला, त्यामध्ये वेकोलीच्या खाणीचे पाणी सोडले असल्याचे  वनपरिक्षेत्र अधिकारी नायगामकर यांनी सांगितले.

तसेच जंगलाला तो भाग लागून असल्याने पाण्याच्या शोधात असलेले जनावरे त्याठिकाणी पाणी प्यायला यायचे. मात्र काही दिवसांपासून काही नागरिक डबक्यात पोहण्यासाठी येत होते. आम्ही अनेकदा त्यांना हाकलून लावले. त्यानंतर सुरक्षिततेसाठी आम्ही त्या परिसरात फेंसिंग लावली, मात्र २ दिवसात फेंसिंग चोरीला गेली, असेही वनपरिक्षेत्र अधिकारी नायगामकर म्हणाले.

हेही वाचा :

Back to top button