नगर : दुसरे लग्न केल्याने पतीविरूद्ध गुन्हा | पुढारी

नगर : दुसरे लग्न केल्याने पतीविरूद्ध गुन्हा

नगर : पतीने दुसर्‍या महिलेसमवेत लग्न केल्याबद्दल पहिल्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कोतवाली पोलिसांनी पतीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. भाऊसाहेब शिवाजी शिरसाठ (रा. केडगाव) असे पतीचे नाव आहे. फिर्यादीचे भाऊसाहेब शिरसाठ याच्याबरोबर 2012 मध्ये लग्न झाले होते. भाऊसाहेब शिरसाट हा आयशर टेम्पो चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या मोबाईलमध्ये एका महिले सोबतचे काही फोटो डिसेंबर 2021 मध्ये आढळून आले.

याबाबत पतीकडे विचारणा केली असता, त्याने मारहाण केली. शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. याबाबत भरोसा सेल येथे तक्रार दाखल केली होती. या ठिकाणी समुपदेशनासाठी चार तारखा झाल्या. दरम्यान, त्यानंतर पतीच्या टेम्पोमध्ये आणखी एका महिलेसोबत गळ्यात हार घातलेला फोटो आढळून आला. याबाबत विचारणा केली असता आपण या महिलेबरोबर लग्न केल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे पतीने बेकायदेशीरपणे दोन महिलांशी विवाह केल्याची फिर्याद कोतवाली पोलिस ठाण्यात पहिल्या पत्नीने दाखल केली आहे.

Back to top button