पिंपरी : मेट्रोकडून निगा न राखली गेल्याने अनेक झाडे जळाली | पुढारी

पिंपरी : मेट्रोकडून निगा न राखली गेल्याने अनेक झाडे जळाली

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात महामेट्रोच्या कामामुळे अनेक झाडे जळाली आहेत. तसेच, पुनर्रोपण केलेली अनेक झाडे ही करपली आहेत. खराळवाडी येथील दुभाजकात ‘महामेट्रो’ अक्षरात सुशोभित केलेली हिरवळीही नियमित देखभालीअभावी नष्ट झाली आहे. शहरात पिंपरी ते फुगेवाडी अशी 5.8 किलामीटर अंतराची मेट्रो 6 मार्चपासून धावत आहे.

तसेच, दापोडीपर्यंत मार्गिकेचे काम पूर्ण झाले आहे. काम करताना अडथळा ठरणारी अनेक मोठी झाडे महामेट्रोने हटविली. त्यातील काही झाडांचे कासारवाडीतील मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्राच्या आवारात पुनर्रोपण केले आहे. त्यासाठी दक्षिण भारतातील एका खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली.

तसेच, वल्लभनगर एसटी आगारातही काही झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले. त्यातील काही झाडे योग्य देखभालीअभावी जळाली आहेत. तसेच, मेट्रो स्टेशनला अडथळा ठरणारी अनेक झाडे तोडण्यात आली. तसेच, त्यांच्या मोठ्या प्रमाणात फांद्या कापण्यात आल्या. त्या झाडांची व्यवस्थित निगा न राखल्याने त्या झाडांना कीड लागून ती जळाली आहेत.

अशी 4 ते 5 मोठी जळालेली झाडे कासारवाडी मेट्रो स्टेशनखाली आहेत. स्टेशनची कामे पूर्ण झाल्यानंतर दुभाजकावरील झाडी व हिरवळी अद्याप पूवर्वत करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे तेथे झुडूप उगवली आहेत. काही ठिकाणी राडारोडा व कचरा साचला आहे.
महामेट्रोने सुशोभिकरणासाठी खराळवाडी येथील दोन पिलरमधील एका दुभाजकात महामेट्रो नावाने हिरवळी केली होती.

मात्र, त्यांची नियमित निगा न राखल्याने ती हिरवळ नष्ट झाली आहे. फुगेवाडी मेट्रो स्टेशनखाली मेट्रोची माहिती देणारा डीजिटल फलक लावण्यात आला होता. त्या फलकाची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी पिलरमधून पावसाचे पाणी गळत आहे. पिंपरी मेट्रो स्टेशनमधील सांडपाण्याची रस्त्यावर गळती होत आहे.

Back to top button