अक्‍कलकोट, करजगी, जेऊर, पानमंगरूळ येथून १२ तलवारी जप्त; ११ जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

अक्‍कलकोट, करजगी, जेऊर, पानमंगरूळ येथून १२ तलवारी जप्त; ११ जणांवर गुन्हा दाखल

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अक्‍कलकोट, करजगी, जेऊर, पानमंगरूळ येथे छापे टाकून २६ हजार १०० रुपये किंमतीच्या १२ तलवारी जप्त केल्या. या तलवारी विकत घेणार्‍या ११ जणांवर अक्‍कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ऑनलाईन तलवारी मागवून त्याची विक्री करणारे रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उघडकीस आणले आहे. त्यामुळे ऑनलाईन शस्त्रविक्रीचा प्रश्‍न ऐरणीवर आलेला आहे.

बमलिंग पंचाक्षरी बमगोंडा (रा. काशिराया काका पाटील वस्ती, जेऊर, ता. अक्‍कलकोट), राहुल सिद्राम हेळवे (वय 20, रा. हेळवे वस्ती, करजगी), अनिल मल्लिकार्जुन हेळवे (वय 20, रा. हेळवे वस्ती, करजगी), रवि सुभाष चव्हाण (वय 23, रा. जोशी गल्ली, करजगी), गजप्पा नागप्पा गजा (वय 23, रा. गजानन वस्ती, करजगी), मनपाक सिराज मिरगी (वय 22, रा. मड्डी वस्ती, पानमंगरूळ), नबीलाल अब्दुलरजाक मळी (वय 20, रा. जमादार गल्ली, पानमंगरूळ), गौतम अंबादास बनसोडे (वय 19, रा. भिमनगर, बंकलगी, ता. दक्षिण सोलापूर), सुरेश इंडे (वय 20, रा. बुधवार पेठ, अक्‍कलकोट), शब्बीर हसन नदाफ (रा. बंकलगी, ता. दक्षिण सोलापूर), नागण्णा सुभाष तळवार (रा. पानमंगरूळ, ता. अक्‍कलकोट) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्‍कलकोट तालुक्यातील जेऊर येथील बमलिंग बमगोंडा हा ऑनलाईनवर तलवारी मागवून त्याची विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बमगोंडा यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच बमगोंडा याने आपण फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून पंजाब राज्यातून तलवारी मागवून घेतल्या असून त्या तलवारी अक्‍कलकोट तालुक्यातील जेऊर, करजगी, पानमंगरूळ, करजगी, अक्‍कलकोट शहरातील तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी गावातील लोकांना विक्री केल्याचे सांगितले.

त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बमगोंडा याच्याकडून तलवारी खरेदी केलेल्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 12 तलवारी जप्त केल्या. याबाबत फ्लिपकार्ट या ऑनलाईन वेबसाईटवरून तलवारी मागवणारा तसेच त्या तलवारी विकत घेणार्‍या 11 जणांवर अक्‍कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील अनेक नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या अनुषंगाने अचारसंहिता सुरु झालेली आहे. आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होऊन शांतता व भयमुक्‍त निवडणुका पार पाडण्यासाठी पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणार्‍या लोकांवर कारवाईचे आदेश दिलेले आहे. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. यापुढील काळातही ऑनलाईनवर शस्त्र मागविणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार.

– पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते

Back to top button