Wari 2022 : तुका म्हणे धावा । आहे पंढरी विसावा ॥ | पुढारी

Wari 2022 : तुका म्हणे धावा । आहे पंढरी विसावा ॥

पंढरपूर, पुढारी वृत्‍तसेवा :  पंढरपूरच्या वारीला फक्त महाराष्ट्रातीलच नाही, तर महाराष्ट्राबाहेरूनही अनेक मराठी भाषिक लोक येतात. आजच्या भागात आपण अशाच महाराष्ट्राबाहेरून येणार्‍या दोन दिंडींची माहिती पाहणार आहोत.

कुकुरमुंडेकर महाराज दिंडी

गुजरातमध्ये तापी जिल्ह्यात कुकरमुंडा संस्थान आहे. या संस्थानचे विद्यमान गादीपती उद्धव महाराज कुकुरमुंडेकर हे आहेत. कुकरमुंडा येथून दरवर्षी आषाढी वारीसाठी पायी दिंडी पंढरपूरला येते. कुकरमुंडा ते पंढरपूर हे अंतर 700 किमी आहे. दिंडी प्रस्थान ज्येष्ठ शुद्ध पंचमीला होते. यावेळी प्रस्थानाचे ठरलेले अभंग म्हटले जातात. त्यानंतर दिंडी निघते. मूळ पुरुषांच्या समाधीपाशी पुन्हा विसावा होतो. येथे गुरुपर अभंग म्हटले जातात. पुढे तापी नदीला नारळ अर्पण करून दिंडी मार्गस्थ होते. दिंडीची विणा व रोजच्या पूजेतील राधा, रुक्मिणीसह असलेली गरुडारूढ विठ्ठल मूर्ती स्वतः गादीमालकांकडे असते.

आषाढ शुद्ध नवमीला दिंडी पंढरपूर येथे पोहोचते. दशमीला सर्व संतांच्या स्वागताला दिंडी पुन्हा वाखरीला जाते व सर्व पालख्यांसह पुन्हा पंढरपुरात प्रवेश होतो. महाराजांचा मुक्काम पंढरपूर येथे भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत असतो. त्यानंतर महाराज सासवड, आळंदी, देहूमार्गे कुकरमुंडा येथे मूळ पुरुषाच्या समाधी उत्सवासाठी जातात.

वै. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर दिंडी

गेल्या शतकात होऊन गेलेले थोर वारकरी सत्पुरुष म्हणजे वै. मामासाहेब दांडेकर. सुशिक्षित पिढीला वारकरी संप्रदायाकडे वळवण्याचे मोठे काम मामांनी केले. मामांच्याच प्रेरणेतून बेळगाव येथील तत्कालीन पेट्रोल पंप व्यवसायिक असलेले वै. ह.भ.प. दिगंबर बुवा परुळेकर यांनी 1968 मध्ये कर्नाटकातील बेळगाव, गोवा, सिंधुदुर्ग आदी भागांतील लोकांना सोबत घेऊन दिंडी सुरू केली. पुढे या दिंडीला मामासाहेबांचेच नाव देण्यात आले. या दिंडीचे व्यवस्थापन व खर्च परुळेकर कुटुंबाकडून केला जातो.

ज्येष्ठ अमावस्येला या दिंडीला पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये कीर्तनसेवा आहे. हे कीर्तन झाल्यावर दुसर्‍या दिवशी आषाढ शुद्ध प्रतिपदेला फलटणवरून दिंडीची पायी वाटचाल सुरू होते. सकाळी हरिपाठ होतो. त्यानंतर नाश्ता होऊन चालायला सुरुवात करतात. मामासाहेब दांडेकर यांच्या भजनी मालिकेप्रमाणे भजन होते. संध्याकाळी प्रवचन अथवा कीर्तन होते. आषाढ शुद्ध दशमीला दिंडी पंढरपुरात पोहोचते व एकादशीलाच नगरप्रदक्षिणा होऊन सर्व मंडळी बेळगावला परत जातात.

– अभय जगताप

Back to top button