सुलेमानी खड्याच्या आमिषाने गंडा | पुढारी

सुलेमानी खड्याच्या आमिषाने गंडा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा सुलेमानी खड्याचे आमिष दाखवून पुणे, कोल्हापूर व केरळ येथील लोकांना सोलापुरातील एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. तसेच तेथे पोलिस असल्याची बतावणी करून पुण्याच्या व्यक्‍तीकडून 5 लाखांची रोकड लुबाडण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी सूर्यकांत बबन आढाळगे (वय 42 रा. सिद्धिविनायक कॉलनी, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बनावट पोलिसासह 5 जणांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा अवघ्या दोन तासांत पोलिसांनी छडा लावला. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करीत 5 लाखांची रोकड जप्‍त केल्याचे पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली.

जाफर ऊर्फ सिराज मोहम्मद हाशम शेख (वय 57 रा. केशवनगर, दक्षिण सदर बझार), इम्रान इलाहीखान पठाण (वय 37 रा. शास्त्रीनगर), सलमान जैनोद्दीन नदाफ (वय 26, रा. सिद्धेश्‍वर नगर भाग-5, मजरेवाडी) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, सोलापूर मध्ये एक व्यक्‍ती सुलेमानी खडा विकतो. त्या सुलेमानी खड्यामुळे आपल्याला कोणतीही इजा होत नाही. सुलेमानी खडा हा अत्यंत दुर्मिळ आहे. तो ज्याच्याकडे असतो त्याची कायम भरभराट होते. त्याला कधीच काही कमी पडत नाही, असा बनाव निर्माण करण्यात आला. त्यानुसार हा सुलेमानी खडा घेण्यासाठी केरळ येथील एक पार्टी सोलापुरात येणार आहे. या खड्याची बाजारात मोठी किंमत आहे. आपण जर याची दलाली केली तर त्यातून मोठे कमिशन मिळते, असे काहीजणांना सांगण्यात आले.

त्यानुसार सुलेमानी खडा विकणारा जाफर भाई (रा. सोलापूर) याने तो खडा दाखविण्यापूर्वी पार्टीकडून 5 लाख रूपये आणावेत. त्याचा शो करावयाचा आहे, असे एकाने फिर्यादी सूर्यकांत आढाळगे यांच्या मित्रास सांगितले. जर पार्टीने 5 लाख रूपये आणल्यास कमिशन म्हणून तुम्हाला दोन लाख रूपये मिळतील, असेही त्याला सांगण्यात आले. त्यानुसार सूर्यकांत आढाळगे याने मित्राकडून हातऊसने घेऊन हे पाच लाख रुपयांसह पैसे खडा घेण्यासाठी सोलापूर गाठले. याचदरम्यान गेल्या 28 जून रोजी केरळ येथून एक पार्टी असाच खडा करण्यासाठी आली. त्यांनी शहरातील एका हॉटेलमध्ये रुम बुक केली. तेथेच सर्व व्यवहार करण्यासाठी जाफरभाईसह अनेकांनी आढाळगे व केरळच्या पार्टीला बोलावले.

त्यानुसार आढाळगे, त्यांचा मित्र व केरळचे चार लोक हे हॉटेलमध्ये आले. त्यावेळी जाफरभाई याने पैसे आणल्याची खात्री करून घेतली. त्याचदरम्यान दोघेजण आम्ही गुन्हेशाखेचे पोलिस आहोत असे सांगून तेथे आले. तुमच्यात काय व्यवहार चालला आहे म्हणत शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरूवात केली. रूममधील लोक बाहेर जाताना जाफरभाईने आढाळगे यांच्या हातातील 5 लाखाची बॅग जबरदस्तीने काढून घेतली. आपली फसवणूक झाल्याचो लक्षात येताच सूर्यकांत आढाळगे यांनी फिर्याद दाखल केली. यावरून बनावट पोलिसांसह पाचजणांंविरूध्द गुन्हा दाखल झाला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक अश्‍विनी भोसले यांनी गुन्हेशाखेच्या पोलिसांना कारवाईचे आदेश दिले. तेंव्हा पोलिसांनी आरोपींच्या वर्णनावरून व मिळालेल्या तांत्रिेक माहिती वरून दोन तासाच्या आत तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 5 लाखाची रोकड जप्त केली. ही कामगिरी अश्‍विनी भोसले, इसाक नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे फौजदार सचिन माळी, हवालदार औदुंबर आटोळे, शहाजहान मुलाणी, पोलिस नाईक राकेश चव्हाण, सागर सरतापे, पोलिस कॉन्स्टेबल सय्यद, भिंगारे, काळजे, बिराजदार, दिंडोरे, शिलके यांनी पार पाडली.

Back to top button