औरंगाबाद : ‘या काजव्यांनो’ परत फिरा रे… | पुढारी

औरंगाबाद : ‘या काजव्यांनो’ परत फिरा रे...

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्याच्या सुरुवातीला रात्रीच्या अंधारात चमचमणारे काजवे सर्वांचे लक्ष घेतात. पूर्वी सर्वत्र चमचमणाऱ्या काजव्यांनी काळोखातही संपूर्ण परिसर उजळून जात असे. मात्रा आता हे चित्र दुर्मिळ झाले आहे. काजवे जणू नामशेष झाले आहे; मात्र नुकतेच केळगाव, आधारवाडी, अजिंठा वनक्षेत्रातील तोंडापूरच्या पाणथळ परिसरात नोंदवलेल्या निरीक्षणात आजही काजव्यांची चमचम टिकून असल्याचे निरीक्षण जैवविविधता अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी नोंदवले आहे.

काजवे पाहण्यासाठी आता काजवे महोत्सवाचे आयोजन केले जाते; मात्र हे महोत्सव बंद करावे म्हणून शासन दरबारी प्रयत्न होत आहे. वाहनांचा तीव— उजेड, काजव्यांना अधिवास आवडणारी झाडांची कत्तल, पाणथळ जागा नसणे, कीटकनाशकांचा बेसुमार वापर, नदीकाठी मानवाने अतिक्रमण केल्याने नदीकाठचे परिसर प्रखर उजेडाने लखलखत असल्याने काजवे आता दिसेनासे होत आहे. वनक्षेत्र परिसरातही काजवे हे जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यावर केवळ 15 ते 20 दिवसच दिसतात. नदी, नाले, तलाव, धरण आदी दमट ठिकाणी काजव्यांचा मुक्त वावर असतो.

दरम्यान, ही विविधता जपण्यासाठी जैवविविधता अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी ‘काजव्यांनो परत फिरा रे ‘ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. एक जुलैला कृषी दिनानिमित्त पालोद वस्ती शाळेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेलगतच्या तलावाच्या काठावर सादळा, अर्जुन, जांभूळ, आंबा, बोखाडा आदी झाडांचे रोपण करण्यात आले. तर शिक्षक राहुल पवार व गणेश चव्हाण, किरण सपकाळ, तोताराम सपकाळ, गोपाळ सपकाळ, राहुल सपकाळ यांनी लावलेल्या रोपांच्या संगोपनाचे पालकत्व स्वीकारले. या झाडांची कोवळी पाने काजवे खातात, काहींवर हमखास अधिवास करतात. तसेच गवताळ, दमट, जमिनीवर काजव्यांची मादी अधिवास व अंडी घालते ते जपण्यासाठी वन जागर सुरू करण्यात आला आहे.

काजवा महोत्सवात भाग घेणारे छायाचित्र काढताना होणार्‍या कॅमेरा फ्लॅश, वाहनांच्या उजेडामुळे परिसरातील अंधार नष्ट झाल्याने काजवे दिसून येत नाही. काजव्याच्या मिलन प्रक्रियेचा कालावधी केवळ 3 आठवडे असल्याने काजवा महोत्सवामुळे त्यांच्या प्रजननात अडथळे येतात. म्हणून ‘काजवा महोत्सव’ बंद करावा.
– डॉ. संतोष पाटील, जैवविविधता अभ्यासक, अभिनव प्रतिष्ठान

Back to top button