बहिणी फडकते ध्वजा | पुढारी

बहिणी फडकते ध्वजा

संत बहिणाबाई म्हणजे संत तुकाराम महाराजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेल्या त्यांच्या शिष्या. ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ या प्रसिद्ध ओळी ज्या अभंगातील आहेत तो ‘संत कृपा झाली। इमारत फळा आली॥’ हा अभंग संत बहिणाबाई यांनी लिहिलेला आहे. संत बहिणाबाईंनी आपले आत्मवृत्तपर अभंग लिहिले आहेत. यामध्ये तुकोबांच्या भेटीचे वर्णन आले आहे. शिवाय ‘ब्रह्मकर्मा चे अभंग’ म्हणून एक अभंग प्रकरण त्यांनी लिहिले आहे. ‘वज्रसूची’ या संस्कृत उपनिषदांवर अभंग माध्यमातून केलेले हे भाष्य आहे. यावरून त्यांचा अधिकार लक्षात येतो. त्यांचे माहेरचे गाव औरंगाबाद जिल्ह्यातील देगाव रंगारी, तर सासरचे गाव येथून जवळच असलेले शिऊर. शिऊरमध्ये त्यांची समाधी आहे.

1952 मध्ये देगाव येथील सत्पुरुष वै. काशिनाथ महाराज मोगल यांनी संत बहिणाबाई पालखी सोहळा सुरू केला. अर्थात, सोहळ्याला सुरुवात झाली तेव्हा सोबत पालखी नव्हती. बहिणाबाईंच्या पादुका डोक्यावर घेऊन दिंडी पंढरपूरला जात असे. आता छोटीशी पालखी व छोटा रथ आहे. हा रथ ट्रॅक्टर लावून ओढतात.

बहिणाबाईंच्या पालखीचे प्रस्थान ज्येष्ठ वद्य दशमीला त्यांच्या समाधी मंदिरातून होते. तत्पूर्वी, समाधीची व पादुकांची पूजा केली जाते. पंचपदीचे भजन होते. त्यानंतर पादुका पालखीत आणून ठेवतात. त्यानंतर गावातून दिंडीसह मिरवणूक निघते. ग्रामस्थांनी निरोप दिल्यावर सोहळा पुढे मार्गस्थ होतो. सोहळ्यामध्ये अनेक दिंड्या नसतात. एकच दिंडी असते. पालखी मार्गावर रोज पहाटे काकडा पूजा, वाटेमध्ये विसाव्याच्या ठिकाणी पंगतवाल्यांचे नैवेद्य, संध्याकाळी मुक्‍कामी पोहोचल्यावर हरिपाठ व त्यानंतर आरती होते. पालखी रात्री रथामध्येच ठेवलेली असते. मुक्‍कामाच्या ठिकाणी रोज रात्री कीर्तन होते. वाटेमध्ये कायगाव टोका या ठिकाणी त्रिवेणी संगमावर पादुकांना स्नान घालण्यात येते.

सोहळ्यासोबत घोडे वगैरे लवाजमा नसतो. त्यामुळे सोहळ्यामध्ये रिंगण वगैरे होत नाही. आषाढ शुद्ध दशमीला पालखी पंढरपुरामध्ये प्रवेश करते. एकादशीला चंद्रभागा स्नान व नगरप्रदक्षिणा होते. पालखीचा मुक्‍काम पंढरपूरमध्ये सातारकर मठाजवळ वडारवाडा या ठिकाणी असतो. बहुतेक पालख्यांचा काला पौर्णिमेला होतो. बहिणाबाईंच्या पालखीचा काला मात्र चतुर्दशीला होतो. सर्व भाविक वाहनाने चतुर्दशीच्या दिवशी परत निघतात. सोहळा देगावाला परत आल्यावर विनवणीचे अभंग, नंतर आरती होऊन सोहळ्याची सांगता होते. या वर्षीच्या सोहळ्यात सुमारे पाचशे भाविक सहभागी होणार
आहेत.

  • अभय जगताप

Back to top button