सांगोला नगरपालिकेची नालेसफाईची मोहीम सुरू | पुढारी

सांगोला नगरपालिकेची नालेसफाईची मोहीम सुरू

सांगोला, पुढारी वृत्तसेवा :  सांगोला शहर व उपनगरात पडलेले पावसाचे पाणी साचून न राहता गटारी व नाल्याच्या माध्यमातून वाहते करण्याच्या दृष्टीने मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका आरोग्य विभागाकडून नालेसफाई व गटारी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने शहराच्या मध्यभागातून जाणारे ओढा-नाले मंगळवारी स्वच्छ करून घेतले असल्याची माहिती नगरपालिका आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

शहरामध्ये गटारी स्वच्छ करणे, पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावणे, वेळोवेळी कचरा उचलणे, खुल्या जागेवरील गवत काढणे आदी कामांचे नियोजन करण्यात आले आहे. सखोल भागामध्ये पाणी साचणार नाही यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील असून शहर व उपनगरात साचणारे पाणी वाहून जाण्याच्या दृष्टीने गटारी व नाले वाहते करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. याची सुरुवात करण्यात आली असून शहरांमध्ये वेळोवेळी गटारींची स्वच्छता करण्याच्या सक्त सूचना मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिल्या आहेत.

यासह शहर व उपनगरातील खुल्या जागांवरील उगवलेली झाडे-झुडुपे व गवत काढून घेण्यासाठी त्या जागामालकांना लवकरच कळविण्यात येणार आहे. पावसाळ्यात सांगोला नगरपालिकेकडून सोयीसुविधा पुरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाणार असल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले आहे.

Back to top button