सोलापूर : खासगी शौचालयांसाठी घरावर लावणार पिवळे झेंडे | पुढारी

सोलापूर : खासगी शौचालयांसाठी घरावर लावणार पिवळे झेंडे

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा :  पालखीमार्गांवर सुमारे पाच हजारांपेक्षा अधिक वैयक्तिक शौचालये वारकर्‍यांच्या सुविधेसाठी देण्यात येणार आहेत. या घरातील कुटुंबप्रमुखांनी सेवा म्हणून घरातील शौचालय वारकर्‍यांना वापरण्यास तयारी दर्शविली आहे. या घरांवर पिवळा झेंडा लावण्यात येणार असून वारकर्‍यांना शौचालयासाठी हे ग्रीन सिग्‍नल असणार आहे.

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी याबाबत पालखीमार्गांवरील नागरिकांना शौचालय उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही शौचालये वारकर्‍यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. घरावर लावण्यात आलेले पिवळे झेंडे हे वारकर्‍यांना शौचालय उपलब्ध असल्याची खूण असणार आहे.

पालखीमार्गांवरील ग्रामपंचायतीं-कडून भाविकांसाठी देण्यात येणार्‍या सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व सीईओ दिलीप स्वामी यांनी केली. यावेळी धर्मपुरीसह पालखीमार्गांची पाहणी करण्यात आली. यावेळी जि.प. ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, पंढरपूरचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे उपस्थित होते.

पालखीमार्गांवरील ग्रामपंचा-यतींचे ग्रामसेवक व सरपंच व संबंधित अधिकारी यांना कामे वेगात करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.वीज, स्वच्छता, मार्गदर्शक फलक बसविण्याच्या सूचना यावेळी सीईओ स्वामी यांनी दिल्या.

‘स्वच्छ भारत मिशन ग्रामीण’ अतंर्गत एक हजार स्वंयसेवक वारकरीबांधवांना विविध सेवा देणार आहेत. या सेवकर्‍यांच्या मोबाईल नंबरसह यादी तयार करण्यात आली आहे. यंदाची वारी ‘निर्मल वारी’ करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.

Back to top button