सोलापूर : ‘हेरिटेज’साठी110 वास्तू, ठिकाणांची शिफारस | पुढारी

सोलापूर : ‘हेरिटेज’साठी110 वास्तू, ठिकाणांची शिफारस

सोलापूर, वेणुगोपाळ गाडी : सोलापूर शहरात काही अपवाद वगळता पाहण्यासारखे काय आहे, असा नकारात्मक सूर नेहमीच आळविला जातो. पण, आता यासंदर्भात चित्र बदलणार आहे. शहरातील 110 वास्तू, ठिकाणांचा हेरिटेजमध्ये (वारसा स्थळ) समावेश होणार असून, यासंदर्भात गठित समितीने प्रारूप यादी तयार केली आहे. शासनाच्या मान्यतेनंतर यावर शिक्कामोर्तब होणार असून, भावीकाळात पर्यटनवाढीसाठी ही एक उपलब्धी ठरणार आहे.

सर्वसाधारणपणे पुरातन, ऐतिहासिक वास्तू या हेरिटेजमध्ये मोडतात, असा समज आहे. गड, किल्ले, वास्तू-स्थापत्यकला आदी वैशिष्ट्यपूर्ण इमारती आदींचा यासंदर्भात प्रामुख्याने उल्लेख होतो. पण याशिवाय राष्ट्रीय प्रादेशिक, स्थानिक तसेच सामाजिक महत्त्व असलेले जे जे काही चांगले आहे, अशा गोष्टींचादेखील हेरिटेजमध्ये समावेश होऊ शकतो. अशा गोष्टींचे जतन होण्याबरोबरच त्याची नवीन पिढीला माहिती व्हावी, पर्यायाने वारसा जपण्याचा प्रयत्न व्हावा, असा ‘हेरिटेज’मागचा उद्देश आहे.

सोलापूर शहरातील अशा गोष्टींची समग्र माहिती मिळविण्याच्यादृष्टीने सन 2003-04 पासून प्रयत्न सुरू झाले. यासंदर्भात सर्व्हे करण्यात आला. दरम्यान, राज्य शासनानेदेखील राज्यातील हेरिटेजसंदर्भातील गोष्टींचे जतन होण्यासाठी धोरण आखले. याअंतर्गत प्रत्येक शहरात हेरिटेज समिती स्थापन करुन माहिती मागविण्याचा प्रयत्न होत आहे.

समितीत आहे ‘यांचा’ समावेश
शासन निर्देशानुसार सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सन 2020 मध्ये हेरिटेज समिती स्थापण्यात आली. या समितीचे अध्यक्ष टी.सी. बेंजामीन असून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ असलेले जगदीश दिड्डी, सविता दीपाली, डॉ. विनायक धुळप, डॉ. नभा काकडे, डॉ. माया पाटील तसेच पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक (पुणे विभाग), पुरातत्त्व खात्याचे अधीक्षक (मुंबई), सहायक संचालक नगररचना, सोलापूर शाखा, सहायक संचालक नगररचना महापालिका हे सदस्य आहेत.
सोलापुरात हेरिटेजविषयक चळवळ उभारणार्‍या इन्टॅक सोलापूर या संस्थेच्या दिलेल्या यादीनुसार हेरिटेज समितीकडून प्रारूप यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. आजवर समितीच्या तीन बैठका झाल्या आहेत. प्रारूप सूचना व हरकतीदेखील मागविण्यात आल्या आहेत. सध्या प्रशासन स्तरावर पुढील काम सुरू आहे. लवकरच प्रारूप शासनाकडे मान्यतेसाठी पाठविण्याचे सोपस्कर करण्यात येणार आहे.
‘महापालिकेचे काम अन् सहा महिने थांब’, असे उपहासात्मक बोलले जाते. पण ‘स्मार्ट सिटी’त समावेशानंतर शहराचा कायापालट होत असून मनपाकडून अनेक चांगल्या गोष्टींची भर पडत आहे. हेरिटेजसंदर्भातील प्रयत्न हे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. शासनाने प्रारूपवर शिक्कामोर्तब केल्यावर शहरातील हेरिटेजचे जतन होणार असून पर्यटनाच्यादृष्टीने अशा गोष्टींना मोठे महत्त्व येणार आहे. यामुळे व्यवसाय, रोजगाराला चालना मिळणार आहे.

बांधकाम विकास शुल्काच्या दोन टक्के निधी राखीव
हेेरिटेजचे जतन करण्यासाठी मनपाकडून निधीची तरतूद केली जात आहे. याअंतर्गत बांधकाम विकास शुल्काच्या दोन टक्के रक्कम या निधीत जमा केली जाणार आहे.

110 वास्तू, स्थळांची यादी
शहरातील हेरिटेजच्या प्रारूप 110 वास्तू, स्थळांची शासकीय इमारती, सार्वजनिक/निमसार्वजनिक वापराच्या इमारती, सार्वजनिक ट्रस्टच्या वापराच्या इमारती, खासगी इमारती, अशी वर्गवारी करुन एकूण तीन ग्रेडमध्ये विभागण्यात आले आहे. यामध्ये भुईकोट किल्ला, सिद्धेश्‍वर तलाव, जनरल पोस्ट ऑफीस, मंगळवार पेठ पोलिस चौकी, जुनी सोलापूर महापालिका, महापालिकेतील इंद्रभुवन, मनपामागील बंगला, डॉ. कोटणीस बंगला, लक्ष्मी मार्केट, गणपती घाट, होम मैैदान, सिद्धेश्‍वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, रावजी सखाराम आयुर्वेदिक रसशाळा हॉस्पिटल, भागवत चित्र मंदिर, लक्ष्मी-विष्णू मिल चिमणी (दोन), एन.जी. मिल परिसर, सिव्हिल हॉस्पिटल ‘बी’ ब्लॉक, जिल्हा न्यायालय इमारत, शासकीय पॉलिटेक्निक कामगार कल्याण केंद्र (कुचन हायस्कूलजवळ), लेडिज आयटीआय, नॉर्थकोट हायस्कूल, कलेक्टर बंगला, पोलिस कमिशनर बंगला, जज बंगला, सिद्धेश्‍वर तलाव, संभाजी तलाव, स्मृतीवन, सिद्धेश्‍वर वनविहार, नागबावडी विहीर, रिपन हॉल, पाच कंदील चौकातील पाच कंदील, उदगिरी गल्ली परिसर, माटे शिव मंदिर, हिराचंद नेमचंद वाचनालय, गोल चावडी, जुना एलआयसी बंगला, साखर पेठ विहीर, दयानंद कॉलेज, हरिभाई देवकरण प्रशाला, मेसॅनिक शाळा, संगमेश्‍वर कॉलेज, वोरोनोको शाळा, हाजीभाई दर्गा, जबितखानाबाबा दर्गा, खंडोबा मंदिर (बाळे), जुने विठ्ठल मंदिर, बुबणे जैन मंदिर, रामचंद्र गांधी पार्श्‍वनाथ मंदिर, आदिनाथ जैन मंदिर, हिराचंद गांधी आदिनाथ जैन मंदिर, कसबा पार्श्‍वनाथ जैन मंदिर, मार्कंडेय मंदिर, उमेदपूर चर्च, दत्त चौक चर्च, रेवणसिद्धेश्‍वर मंदिर, शुभराय मठ, सोन्नलगी सिद्धेश्‍वर मंदिर, जोडभावी पेठ जैन मंदिर, 68 लिंग व गणपती मंदिर, धनराज (मुळे) हॉस्पिटल, नगरेश्‍वर मंदिर, दत्त मंदिर (दत्त चौक), राम मंदिर (नवी पेठ), सरस्वती मंदिर (सरस्वती चौक), चौडेश्‍वर मंदिर व वाडा उदगिरी गल्ली, काळजापूर मारुती मंदिर, किरिट स्वामी मठ, महासिद्धेश्‍वर मंदिर (डफरीन चौक), गद्रे लक्ष्मी मंदिर, केकडे राधाकृष्ण मंदिर, भडंगे विठ्ठल मंदिर, शनी मंदिर दिंडोरकर वाडा, पाणी वेस, पापय्या तालीम (जुनी मिल कंपाऊंड), जुनी मिल विहीर (2), एन.जी. मिल विहीर, माटे बाग, मोेती बाग, बेंबळगी विद्यालय (तुळजापूर वेस), सरस्वती मंदिर शाळा, सेवासदन शाळा, हायर प्राथमिक शाळा, शाहजहूरवगली दर्गा, रूपाभवानी मंदिर, हिंगुलांबिका मंदिर, इराबत्ती मारुती मंदिर, मंगळवार पेठ बालाजी मंदिर, मंगळवार पेठ नारायण मंदिर, कसबा पेठ गायखाटिक मस्जिद, जामी मस्जिद, कसबा पेठ काळी मस्जिद, पारसी अग्यारी (सदर बझार), रोमन कॅथोलिक चर्च, जोसेफ हायस्कूल, राघवेंद्र स्वामी मठ, श्रद्धानंद तालीम (तुळजापूर वेस), मल्लिकार्जन मंदिर विहिर, अबदुलपूरकर वाडा, काडादी वाडा (मंगळवार पेठ), जीवन महाल, माणिकचंद शहा बंगला, शेटे वाडा, चंडक बंगला (टिळक चौक), चंडक बंगला (मोदी), धनराज महाल, बसवंती बंगला, संतोजी मठ, सोमाणी बंगला मेन रोड व कॉर्नर बंगला, जेठाराम भवानी (रणजित
गांधी).

इंद्रभुवनला मूळ रूप देण्याचे काम प्रगतिपथावर
महापालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत असलेल्या इंद्रभुवन या हेरिटेज वास्तूला ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून पाच लाख रुपये खर्चून मूळ रूप देण्याचे काम सुरू आहे. याच पद्धतीने भावी काळात हेरिटेजमध्ये समाविष्ट वास्तू, ठिकाणांचे जतन होणार आहे.

Back to top button