चिपळुणात डासांकडून न.प.चे ‘गुनगुन गाणं’ | पुढारी

चिपळुणात डासांकडून न.प.चे ‘गुनगुन गाणं’

चिपळूण पुढारी वृत्तसेवा : गतवर्षीच्या महाप्रलयानंतर शहरात न.प.ने नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शहरभर जंतुनाशक फवारणी केली. काही कालावधीनंतर शहरात बापटआळी परिसरात डेंग्युसदृश आजाराची साथ पसरली. त्यावेळी युद्धपातळीवर औषध फवारणी करण्यात आली. मात्र, त्यानंतर तब्बल आठ महिन्यांत शहरामध्ये कीटकनाशक फवारणी न झाल्याने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शहरामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने गुनगुनणारे डास जणूकाही न.प.च्या कारभाराचे गुणगान गात असल्याचा भास होऊ लागला आहे.

सर्वसाधारणपणे थंडीचा हंगाम संपल्यावर शहरात उष्णतेबरोबरच डासांचा प्रादुर्भाव वाढतो. वेळीच त्यावर उपाययोजना व नियोजन न केल्यास डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. यावर्षी चिपळुणात आलेल्या पुरानंतर सुरुवातीचे दोन-तीन महिने न.प. प्रशासनाने औषध फवारणीचे काम केले. त्यानंतर काही काळाने शहरात डेंग्यूसदृश आजार आणि डासांचे अस्तित्त्व आढळून आले. प्रामुख्याने भर वस्तीच्या बापटआळी परिसरात डेंग्यूसदृश डासांच्या जाळ्या आढळून आल्या. त्या प्रमाणात रुग्णदेखील आढळून आले. दरम्यान, एक-दोन व्यक्‍तींचा त्यात मृत्यू झाला.

यानंतर जागे झालेल्या न.प. प्रशासनाने या परिसरात धूर फवारणीसह जंतुनाशक फवारणी सुरू केली. त्यानंतर तब्बल आठ महिन्यांत न.प.च्या आरोग्य विभागाकडून शहरातील कोणत्याही प्रभागात आजतागायत धूर व कीटकनाशक फवारणी केली नाही. तेरा प्रभागांसाठी 13 फवारणी मशिन मध्यंतरात न.प.ने खरेदी केली. तसेच धूर फवारणीसाठी सद्यस्थितीत दोन ते चार मशिन उपलब्ध आहेत.

पावसाळ्याच्या सुरुवातीला न. प. डीडीटी पावडर फवारणी करते. मात्र, गेल्या काही वर्षांत शहरामध्ये महापुराचा अपवाद वगळल्यास पावडर मारण्यात आली नाही. मोठ्या प्रमाणात जंतुनाशक रसायन व पावडर खरेदी करण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. मात्र, प्रत्यक्षात त्याचा वापर न होता या खर्चाची नेमकी गळती कशी लागते हा संशोधनाचा विषय आहे. एकूणच डासांचे गुणगुणणे न.प.चे गुण गाणारे ठरत आहे.

आठ महिन्यांत फवारणी नाही; नागरिक हैराण

डासांची उत्पत्ती रोखायला हवी

सर्व यंत्रणा असूनही गेल्या आठ महिन्यांत डासांची उत्पत्ती रोखणारे कोणतेही नियोजन न केल्याने सद्यस्थितीत भरमसाठ वाढलेल्या डासांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. सायंकाळनंतर डासांची गुणगुण सुरू होते. डासांची गुणगुण सुरू राहिल्याने अनेकांची झोपमोड होऊन नागरिक न.प.च्या कारभारावर संताप व्यक्‍त करतात.

हेही वाचा

Back to top button