जागतिक योग दिन : कोरोनात वाढलेल्या मधुमेहावर योगाचा उतारा | पुढारी

जागतिक योग दिन : कोरोनात वाढलेल्या मधुमेहावर योगाचा उतारा

सातारा; पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात लॉकडाऊन व संचारबंदीमुळे ताणतणाव वाढून मानसिक स्वास्थ्य हरपले होते. व्यायामाच्या अभावाने अनेकांना उच्च रक्तदाब, मधुमेहासह विविध गंभीर आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले. कोरोनात वाढलेल्या मधुमेहावर योगाचा उतारा देण्यात आल्याने अनेकांना लाभ झाला. मागील काही वर्षांपासून शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालयांसह सर्व स्तरावर जागतिक योग दिन साजरा केला जात असून दैनंदिनीचा एक भाग झालेल्या योगाला व्यायामामध्येही महत्त्व दिले जावू लागले आहे.

मागील दोन वर्षात आरोग्य, व व्यायामाचे महत्व वाढले असून त्यामध्ये योगाला प्राधान्य दिले जावू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रोत्साहनामुळे मागील काही वर्षांपासून देशभर आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विविध सामाजिक संस्था, हेल्थ क्लब, क्रीडा संकुले तसेच शासकीय पातळीवर जागतिक योग दिनानिमित्त मोठ्या प्रमाणावर नागरिकांना सहभागी होण्यासाठी आवाहन केले जाते. नागरिकांचाही त्यास चांगला प्रतिसाद मिळत असतो. यावर्षीदेखील तब्बल दोन वर्षानंतर सार्वजनिक रित्या योग दिन साजरा केला जाणार आहे. केवळ एक दिवस साजरा न करता दैनंदिन व्यायामामध्येही योगाला विशेष महत्व दिले जात आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये आधुनिकतेच्या नावाखाली यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. दैनंदिन कामातून होणारा व्यायाम कमी झाला आहे. शारीरिक हालचाली मंदावल्याने लठ्ठपणा, रक्तदाब, मधुमेहाची रुग्णसंख्या वाढल्याचे आरोग्य तज्ञांनी व्यक्त केले आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे योगाभ्यासाचे महत्व अधिक वाढले आहे. लॉकडाऊन व संचारबंदीच्या कालावधीत घरात राहिल्याने ताण-तणावांमुळे मानसिक स्वास्थ हिरावले होते. नागरिकांना अनेक शारीरिक व्याधी जडल्या होत्या. मुधुमेहाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. संसर्गाच्या धास्तीने नियमित तपासणीसाठी बाहेर पडणे शक्य होत नव्हते. अशा वेळी अनेकांनी ऑनलाईन योगावर्गांमध्ये सहभागी होत आपले आरोग्य सुधारले. सर्वसाधारणपणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी नियमित व्यायाम आवश्यक असून तणावमुक्त राहणे गरजेचे असते. त्यांच्यासाठी सर्वांगसुंदर व्यायाम म्हणून योगाचा पर्याय निवडला जात आहे. त्यामुळे वाढलेल्या मधुमेहावर योगाचा उतारा मिळत असल्याने रुग्णांच्या रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित राहत आहे.

फिटनेस वर्ग व कार्यशाळा, शिबिरांचे आयोजन

जागतिक योग दिन मंगळवार, दि.21 जून रोजी साजरा होत असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिकठिकाणी फिटनेस वर्ग, कार्यशाळा व शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील आठवड्यापासूनच काही योगवर्ग सुरु झाले असून त्यामध्ये मोफत योगाच्या प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जात आहे. योगाभ्यासासह रक्तदान शिबिर, आरोग्य व आहार मार्गदर्शनासह इतर उपक्रमही राबवण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी काही महाविद्यालयांच्या क्रीडा विभागाकडूनही ऑनलाईन योगाचे धडे दिले जाणार आहेत.

असे आहेत योगाचे लाभ…

मधुमेही व्यक्तींच्या रक्तामध्ये निर्माण होणारी साखर नियंत्रित करते.
रक्तदाब नियंत्रित राहतो. हृदयाची कार्यक्षमता वाढते.
शरिराची लवचिकता वाढते. ताण-तणावर कमी होतात.
शांत झोप मिळाल्याने मन प्रसन्न राहते.
शारिरीक व्याधी कमी झाल्याने मानसिक स्वास्थ्य लाभते.

Back to top button