कार्डधारकांची रेशनसाठी त्रेधातिरपीट! | पुढारी

कार्डधारकांची रेशनसाठी त्रेधातिरपीट!

सोलापूर : महेश पांढरे जिल्ह्यातील हजारो कार्डधारकांना स्वतःचे गाव सोडून इतर गावात जाऊन रेशनचे धान्य घेण्यासाठी त्रेधातिरपीट करावी लागत आहे. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कार्डधारकांना हा वनवास भोगावा लागत आहे. त्यामुळे ज्या त्या गावात रेशन दुकांनाना परवाना द्यावा, आणि सुरळीत वितरण करावे, अशी मागणी या नागरिकांनी लाऊन धरली आहे.

गेल्या दीड ते दोन वर्षांत सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत असणार्‍या रेशन दुकानांचा परवाना काही कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे काही रेशन दुकानदारांविरोधात तक्रारी असल्याने त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. काही लोकांनी रेशन दुकानच नको म्हणून पुरवठा विभागाकडे राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे अशी जवळपास 206 रेशन दुकाने अधांतरी आहेत. त्यांच्याकडे असलेल्या कार्डधारकांना महिन्याचे रेशन देण्यासाठी शेजारच्या गावातील रेशन दुकानदारांना जोडून दिले आहेत. त्यामुळे दरमहिन्याचे रेशन घ्यायला या लोकांना आपले गाव सोडून दुसर्‍याच्या गावात जावे लागत आहे.

अनेकवेळा मूळ गाव असलेल्या रेशन दुकानातील कार्डधारकांना रेशन दिल्याशिवाय इतर लोकांना नाही, असा फतवाच त्या जोडण्यात आलेल्या रेशन दुकानदारांनी काढलेला दिसून येत आहे. त्यामुळे असे रेशन दुकानदार आपल्या मूळ गावातील रेशन वाटून झाल्याशिवाय जोडलेल्या गावातील लोकांना रेशन वाटप करत नाहीत. त्यामुळे रेशनचा माल घेण्यासाठी दुसर्‍या गावात गेलेल्यांना त्रास सोसावा लागत आहे. जिल्हा पुरवठा विभागाने यासाठी तातडीने नव्याने परवाना देण्यासाठी जाहीरनामा काढावा आणि तातडीने त्या त्या गावात रेशन दुकानाचा परवाना द्यावा, अशी मागणी या नागरिकांनी लाऊन धरली आहे. जर वेळेत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास जिल्हा पुरवठा विभागाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

जिल्ह्यातील सर्वाधिक बार्शी तालुक्यातील 78 दुकाने दुसर्‍याला जोडली आहेत. यापैकी काही दुकानांचा परवाना निलंबित आहे, तर काहींची तक्रार सुरू असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे. सर्वात कमी सांगोला तालुक्यातील तीन दुकाने आहेत. त्यामुळे लोकांचा वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी पुरवठा विभागाने तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी आहे.

काही परवान्यांच्याबाबतीत न्यायालयीन प्रक्रिया

जिल्ह्यातील एकूण 1555 रेशन दुकानांपैकी जवळपास 206 रेशन दुकानांचे कार्डधारक इतर ठिकाणी जोडण्यात आलेले आहेत. यापैकी काही परवाने रद्द, तर काही निलंंबित करण्यात आलेेले आहेत. काहींनी स्वत:हून राजीनामा दिलेला आहे. काही निलंबित रेशन दुकानदार न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे उर्वरित रेशन दुकानांचा जाहीरनामा लवकरच काढू, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली आहे.

Back to top button