क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चौकात अपघातांमध्ये वाढ | पुढारी

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चौकात अपघातांमध्ये वाढ

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा सांगोला रोडवरील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चौक येथून जिल्हा न्यायालयाकडे व कासेगाव रस्त्याकडे जाणार्‍या वळणावर वारंवार अपघात घडत आहेत. या वळणावर सहा महिन्यांत आजपर्यंतसुमारे 35 हून अधिक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. यामध्ये एकाचा मृत्यू तर एकास कायमचे अपंगत्व आले आहे. यामुळे जुना कासेगाव रस्ता व जिल्हा न्यायालयाकडून महामार्गास जोडणार्‍या दोन्ही रस्त्यांवर गतिरोधक करावे, अशी मागणी पालक वर्ग व नागरिकातून होत आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरची ओळख आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक पंढरपूरात येत असातात. भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूरच्या दिशेने येणारे सर्व रस्त्यांचे रुंदीकरण करून सिमेंट कॉक्रिटचे करण्यात आले आहे. रस्ते गुळगुळीत व मोठे झाल्यामुळे या रस्त्यावर वाहने सुसाट चालत आहेत. पंढरपूर शहरापासून 1 किलोमीटर अंतरावर पंढरपूर-सांगोला मार्गावर सुसज्ज असे भव्य जिल्हा न्यायालय, एम. एस. इ. बी. कार्यालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, विवेक वर्धिनी महाविद्यालय, मा. आ. स्व. भारत भालके यांचे निवासस्थान (ऑफीस), पद्मावती ट्रॅक, बुद्धविहार, जुना कासेगाव रोड, लोटस् इंग्लिश स्कूल असल्यामुळे या मार्गावर नेहमीच नागरिकांची व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.

नुकताच पंढरपूर-सांगोला रोड हा सिमेंट रोड करण्यात आला आहे. या मार्गाचे सिमेंट रोडमध्ये रुपांतर झाल्याने रस्त्यावरून सुसाट वाहने धावत आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले चौक येथून कासेगाव, आय. टी. आय. कॉलेज, विवेक वर्धिनी विद्यालय, लोटस स्कूल या दिक्षेने मोठ्या प्रमाणावर वाहने व विद्यार्थी ये-जा करीत असतात. तसेच याच चौकातून जिल्हा न्यायालय, पद्मावती ट्रक, बुध्दविहार, मा. आ. स्व. भालके निवासस्थानाकडे जाणार्‍या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या वळणावर सांगोला व जुना कासेगाव रोडवरून भरधाव वेगाने वाहने येत असल्यामुळे जिल्हा न्यायालयाकडे जाणारे वाहन चालकांची अचानक भरधाव वेगाने समोरून आलेल्या वाहनामुळे तारांबळ होती.

यामुळे काही वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होत आहे. जानेवारी 2022 पासून या चौकात सुमारे 35 अपघात घडले आहेत. या अपघातात एकाचा मृत्यू तर एकाच कायमचे अपंगत्व आले आहे. तरी महामार्गास जोडणार्‍या दोन्ही रस्त्यास गतिरोधक करण्यात यावेत अशी मागणी नागरिक व पालक वर्गातून होत आहे.

Back to top button