इलेक्शन ड्युटीवर आहे, कामाचे नंतर पाहू! मुंढवा, केशवनगरमधील नागरिकांना अधिकार्‍यांची उत्तरे | पुढारी

इलेक्शन ड्युटीवर आहे, कामाचे नंतर पाहू! मुंढवा, केशवनगरमधील नागरिकांना अधिकार्‍यांची उत्तरे

मुंढवा : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यापासून महापालिकेतील अनेक अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही कामासाठी संपर्क साधला असता निवडणुकीच्या कामात आहे, निवडणूक झाल्यावर पाहतो, अशी उत्तरे संबंधित अधिकार्‍यांकडून मिळत असल्याने नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहत आहेत.

घोरपडी, मुंढवा व केशवनगर परिसरात मागील महिनाभरापासून पाणीटंचाईची समस्या जाणवत आहे. ड्रेनेजलाइन दुरुस्ती, अनधिकृत होर्डिंगवरील कारवाई, नागरी प्रश्न, तसेच अनेक छोटे-मोठी विकासकामे थंडावली आहेत. या कामांसाठी नागरिक महापालिका अधिकार्‍यांशी संपर्क साधत आहेत. मात्र, त्यांना ’निवडणूक मीटिंगमध्ये आहे, निवडणूक ट्रेनिंगमध्ये आहे. स्लिपा वाटपाचे काम सुरू आहे,’ अशी उत्तरे अधिकार्‍यांकडून मिळत आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभा व नंतर महापालिका निवडणुका असणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षभरामध्ये महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामांमध्ये असेच अडकून राहिले, तर विकासकामे व स्थानिक प्रश्न कसे मार्गी लागणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. याबाबत महापालिका अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. घोरपडी येथील बी. टी. कवडे रोड ते भीमनगर या डीपी रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत आहे. याविषयी मागील सहा महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे काम तातडीने मार्गी लावण्याचे आदेश महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिले होते. मात्र, हे काम तर मार्गी लागलेच नाही, पण आता आम्ही निवडुकीच्या कामांमध्ये व्यस्त असल्याचे उत्तर अधिकारी नागरिकांना देत आहेत.

अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट

सोलापूर रोड, मुंढवा, केशवनगर येथे अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट झाला आहे. यावर कारवाई करण्याविषयी हडपसर व वानवडी क्षेत्रीय कार्यालयाकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मागील महिनाभरापासून ही कामे ठप्प असून, निवडणूक झाल्यावर कारवाई केली जाईल, असे उत्तर संबंधित अधिकार्‍यांकडून नागरिकांना दिले
जात आहे.

महापालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामामध्ये व्यस्त असल्याने नागरिकांचे प्रश्न रखडले आहेत. निवडणुकांची जबाबदारी पार पाडण्याबरोबरच महापालिकेने नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठीही काही अधिकार्‍यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे.

– अ‍ॅड. राजशेखर गायकवाड, मुंढवा

हेही वाचा

Back to top button