रत्नागिरी : पूर्वमोसमी रुसल्यास खरीप कामांची रखडपट्टी; | पुढारी

रत्नागिरी : पूर्वमोसमी रुसल्यास खरीप कामांची रखडपट्टी;

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा
गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्यात पूर्व मोसमीच्या समाधानकारक सरी झाल्यानंतर कोकणात पूर्व मोसमीने पाठ फिरविली आहे. हवामान विभागाचा अंदाज असतानाही शुक्रवारसह शनिवारीही कोरडे वातावरण होते. पूर्व मोसमी समाधानकारक न झाल्यास कोकणातील खरिपातील बेगमीची प्राथमिक टप्प्यातील कामे रखडण्याची भीती आहे.

वार्‍यांचा वेग मंदावल्याने मोसमी पावसाच्या प्रवासासाठी वातावरणीय स्थिती प्रतिकूल ठरली आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून मोसमी पावसाबरोबर पूर्व मोसमी पावसाचा प्रवासही रखडला आहे. मान्सूनचा प्रवास गोव्यापासून काही कि.मी. अंतरावर कारवारमध्ये रखडला. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील पूर्व मोसमी पावसात निर्माण झालेल्या अडथळ्याने मोसमी पावसाचे आगमनही लांबण्याची शक्यता आहे.आता मान्सूनचे आगमन दि. 9 जून रोजी होण्याची शक्यता असून, किनारपट्टी भागात तापमानातही वाढ होण्याचा नवा अंदाज हवामान विभागाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर शनिवारी वर्तवला आहे.

मोसमी पावसाचे आगमन काही दिवसांवर आले असतानाच, कोकणाच्या तुलनेत अन्य विभागात उन्हाचा दाह वाढू लागला आहे. कोकणातील पाच जिल्ह्यांत तापमान 32 ते 34 अंशांपर्यत सरकले आहे. अशातच पूर्वमोसमीही रुसल्याने तापमानात वाढ झाली. रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी तापमान 34 अंश सेल्सियस नोंदविले. तरीही बंगालच्या उपसागारत मान्सूनची होणारी आगेकूच प्रभावित करणारी ठरणार असून, त्याच्या प्रभावाने कोकण किनारपट्टीत रविवारी आणि सोमवारी दोन दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

दरम्यान, गुरुवारी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण आणि संगमेश्वरसह काही भागांत जोरदार बिगर मोसमी पाऊस झाला. त्यानंतर शुक्रवार, शनिवारीही पूर्व मोसमीत सातत्यपूर्ण वातावरण होते. मात्र, तुरळक सरींचा अपवाद वगळता शुक्रवारबरोबरच शनिवारीही पूर्वमोसमी पावसाची घागर रिकामीच राहिलेली पहायला मिळाली.

मोसमी पावसाला विलंब झाला तर

पूर्व मोसमी पावसाची प्रतिक्षा जिल्ह्यात सुरू असताना दोन दिवस जवळपास कोरडे गेले. त्यामुळे आता आगामी दोन दिवसतरी हलका पाऊस झाल्यास खरिपाच्या बेगमीतील प्राथमिक कामे हाता वेगळी करण्याची जुळवाजुळव सुरू केली आहे. अशातच मोसमी पावसाला ही विलंब झाल्यास खरीपातील कामे रखडण्याची शक्यता आहे.  आदर्श पुरस्कार प्राप्त शेतकरी- आत्माराम पाडावे, मिरजाळेे, रत्नागिरी

Back to top button