मनसुख हत्येत सुनील माने यांचा थेट सहभाग | पुढारी

मनसुख हत्येत सुनील माने यांचा थेट सहभाग

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्याप्रकरणात मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस निरीक्षक सुनील माने यांचा थेट सहभाग असल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहे. त्यामुळेच एनआयए विशेष न्यायालयाने माने यांच्या कोठडीत 1 मेपर्यंत वाढ केली आहे.

रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटके आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ कार उभी केल्याप्रकरणी आणि याप्रकरणातील सहभागीदार व प्रमुख साक्षीदार मनसुख हिरेन हत्याप्रकरणाचा एनआयए तपास करत आहे. एनआयएने माने यांना 23 एप्रिलला अटक केली होती. न्यायालयाने सुनावलेली पाच दिवसांची कोठडी संपत असल्याने एनआयएने मानेला बुधवारी विशेष एनआयए न्यायालयात हजर केले होते.

एनआयएने यापूर्वी न्यायालयात केलेल्या दाव्यानुसार 4 मार्च रोजी मुंबई पोलीस दलातील तत्कालीन गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी जसा आपला मोबाइल पोलीस आयुक्तालयात ठेवून ठाण्याच्या दिशेने प्रवास केला होता तसेच सुनिल माने यांनी केले होते. मानेंनी स्वत:चा फोन बंद करून बॅगेत ठेवत ही बॅग सहकार्‍यांना घरी नेऊन देण्यास सांगितली होती.

सुनील माने हे त्यानंतर खासगी गाडीने कळवा येथे पोहचले. तोपर्यंत सचिन वाझेंनी रुमाल खरेदी केले होते. माने यांनी वाझेंना खासगी वाहनाने गायमुख परिसरात आणले. माने यांनीच तावडे नावाने मनसुख यांना संपर्क साधून घोडबंदर परिसरात बोलावले. मानेंनी मनसुख यांचा मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर बंद केला. मनसुख यांच्या हत्येनंतर वाझे मुंबईला परतले. तर, माने हे वसईला गेले. वसईला गेल्यानंतर मानेंनी मनसुखचा मोबाईल पुन्हा सुरू केला. जेणेकरून मनसुख हे वसईला गेले होते, असे दाखवत पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात हस्तगत केलेले पुरावे, कॉल रेकॉर्ड याच्या अनुषंगाने माने यांची अधिक चौकशी करायची असल्याने कोठडी आवश्यक आहे,असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले आहे.

Back to top button