वाहतूक नियंत्रणासाठी केवळ 55 पोलिस | पुढारी

वाहतूक नियंत्रणासाठी केवळ 55 पोलिस

जालना : अप्पासाहेब खर्डेकर

शहरातून धावणार्‍या अडीच लाख वाहनांना नियंत्रित करण्यासाठी केवळ 55 वाहतूक पोलिस कार्यरत आहेत. शहर वाहतूक शाखेतील 55 पोलिसांपैकी दररोज 8 पोलिस कर्मचारी साप्ताहिक किंवा गरजेच्या रजेवर राहतात. त्यामुळे 47 पोलिसांनाच वाहतूक नियंत्रित करावी लागत असल्याने मोठी दमछाक होत आहे. 

शहराची लोकसंख्या चार लाखांवर आहे, तर वाहनांची संख्या त्या तुलनेत कमालीची वाढली आहे. एकाच घरात, आईची, मुलांची व वडिलांसाठी स्वतंत्र वाहने आहेत. शहरातील सर्वाधिक वर्दळीचे 11 फिक्स पॉइंट असून, एका पॉइंटवर दोन ते तीन पोलिसही कमी पडत आहेत. त्यानुसार ट्रॅफिक जॅम असणे, बंदोबस्त अशा कामी वाहतूक पोलिसांची ड्युटी लावल्या जात असल्याने वाहतूक नियंत्रणाचा प्रश्‍न नेहमीच निर्माण होत आहे.

दररोज 8 पोलिस कर्मचारी साप्ताहिक किंवा गरजेच्या रजेवर राहत असल्याने 47 पोलिसांवर शहर वाहतुकीची मदार आहे. वाहतूक नियंत्रण शाखेची धुरा पोलिस निरीक्षक संतोेष पाटील यांच्या खांद्यावर आल्यानंतर त्यांनी वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलिसांची अपुरी संख्या आणि शहरातील वाहनांच्या वाढती गर्दीमुळे दररोजच्या वाहतुकीचे नियंत्रण करताना वाहतूक पोलिसांची कसोटी लागत आहे. 

वाहनांची संख्या

शहरासह जिल्ह्यात 3 लाख 83 हजार 580 एकूण वाहने आहेत. यात 3 लाख 12 हजार 731 दुचाकी वाहनांचा समावेश आहे. उर्वरित चारचाकी, जड चारचाकी, तीन चाकी, बसेस आदी वाहनांचा समावेश आहे. जिल्ह्यासह देऊळगावराज, सिंदखेडराजा, औरंगाबाद आदी ठिकाणांहून दररोज एक लाखापर्यंत वाहने शहरात येतात. 

शहर वाहतूक शाखेकडे पोलिसाची संख्या कमी असूनही वाहतूक पोलिसांकडून कर्तव्यात कुठलीही कमतरता नसते. अरुंद रस्ते, स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था आदी समस्या दिसून येत आहे. मागील दहा महिन्यांपासून बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. 22 तारखेनंतर पी 1, पी 2 पार्किंगची व्यवस्था सुरू करण्यात येईल.
– संतोष पाटील, पोलिस निरीक्षक
 

Back to top button