विमानतळासाठी जमीन देण्यास ग्रामस्थांचा विरोध | पुढारी

विमानतळासाठी जमीन देण्यास ग्रामस्थांचा विरोध

रत्नागिरी : प्रतिनिधी

मिरजोळे गावातील एमआयडीसी आणि कोकण रेल्वेसाठी 1 हजारहून अधिक एकर जमीन यापूर्वीच शासनाने घेतली आहे. उर्वरित जमिनींपैकी घर बांधण्यासाठी उपयुक्‍त असलेली जमीन आता विमानतळासाठी जात आहे. त्यामुळे गावात निवासासाठी जमीनच राहणार नाही, अशी खंत व्यक्‍त करत नागरी वाहतूक विमान सेवेअंतर्गत विमानतळाच्या विस्तारीकरणाला मिरजोळे तसेच शिरगाववासीयांनी विरोध दर्शवला.

जिल्हा परिषदेतील लोकनेते श्यामरावजी पेजे सभागृहात गुरुवारी प्रशासन आणि मिरजोळे व शिरगाव ग्रामस्थांची संयुक्‍त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रांताधिकारी अमित शेडगे, कोस्टगार्डचे अधिकारी, मिरजोळे सरपंच गजानन गुरव, शिरगाव सरपंच वैशाली गावडे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शेडगे यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे रत्नागिरीतील विमानतळावर नागरी विमान वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण करणे क्रमप्राप्त आहे. या विस्तारीकरणात मिरजोळे आणि शिरगाव येथील जमीन ताब्यात घेतली जाणार आहे. सध्या गुगल मॅपवरून विमानतळाचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून, लवकरच त्याठिकाणी जाऊन क्षेत्र निश्‍चितीसाठी संयुक्‍त मोजणी करण्यात येणार आहे. 

पाचपट दरापेक्षा जमीन मौल्यवान

रेडिरेकनरच्या दरापेक्षा पाच पट अधिक दर प्रकल्पग्रस्तांना देण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे. मात्र, येथील अनेक कुटुंबे संयुक्‍त पद्धतीने राहतात. यातील काहीजणांना वेगळे घर बांधायचे झाल्यास त्यांना या प्रकल्पामुळे गावात जागाच उरणार नाही. त्यामुळे आम्हाला पाचपट दर नको, आमची मौल्यवान जमीन आमच्याकडे राहू द्या, अशी मागणी यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी केली.

2013 च्या कायद्यांतर्गत भूसंपादन

भूसंपादनच्या 2013 कायद्या अंतर्गत भूसंपादन  करण्यात येणार असून, ज्या दिवशी खरेदीखत होईल त्या दिवशीच्या रेडीरेकनर दराच्या पाच पट अधिक मोबदला  जमीन मालकाला देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. यावर आपले म्हणणे मांडताना मिरजोळे ग्रा.पं.चे सरपंच गजानन गुरव यांनी सांगितले की, वितानतळासाठी 80 एकर जागा जाणार आहे. या जागेत ग्रामस्थांनी घरे बांधली आहेत. जर त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या तर हे ग्रामस्थ विस्थापित होतील आणि त्यांच्या निवासाचा प्रश्‍न उद्भवेल. जमीन संपादनाच्या विरोधाचा ठराव ग्रामपंचायतींच्या सभेत झाला असून, आम्ही ग्रामस्थांसोबत आहोत. यावेळी उपस्थित ग्रामस्थानींही आपले म्हणणे प्रशासनापुढे मांडले.

Tags : Resistance, villagers, give, land airport

Back to top button