दहशतवाद्यांचे महाड कनेक्शन उघड | पुढारी | पुढारी

दहशतवाद्यांचे महाड कनेक्शन उघड | पुढारी

महाड : विशेष प्रतिनिधी      

बांगलादेशी सरकारने बंदी घातलेल्या अरसानउल्ल बांगला टीम (एबीटी) या दहशतवादी संघटनेशी लागेबांधे असलेल्या तीन बांगलादेशी घुसखोरांना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुणे परिसरातून अटक केल्यानंतर महाड येथून आणखी एका बांगलादेशी घुसखोराला पकडण्यात आल्यामुळे दहशतवाद्यांचे महाड कनेक्शन उघड झाले आहे. 

बांगलादेशी दहशतवाद्याला महाड न्यायालयात हजर केले असता 29 पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. बांगलादेशी घुसखोरांची पाळेमुळे महाडपर्यंत पोहोचली असल्याचे उघड झाले आहे. यापूर्वी 1992 च्या बॉम्बस्फोटातील स्फोटके रायगड जिल्ह्यातील शेखाडी येथून गेल्याचे उघड झाले होते. 

पुणे आकुर्डी व वानवडीमध्ये तीन बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्य करत असून त्यांचा बांगला देशीतल बंदी असलेल्या ‘एबीटी’ या संघटनेशी संबंध असल्याची माहिती मिळताच, पुणे एटीएसचे सहायक आयुक्‍त सुनील दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राम जाधव यांच्या पथकाने पुण्यातील आकुर्डी व वानवडी येथून 17 मार्चला महंमद हबीदउर रहमान हबीब ऊर्फ राज जेसूब मंडल, महंमद रिपन होस्सेन आणि हन्‍नान अन्वर हुसेन खान या तिघांना ताब्यात घेतले. यानंतर तपासाची गती वाढवल्यानंतर एटीएसने महंमद हसनअली महंमद अमीर अली (24 रा. गुघा, बांगलादेश) याला महाड येथून 20 मार्चला ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वांकडून बनावट आधारकार्ड व बनावट पॅनकार्ड जप्त करण्यात आली आहेत. दहशदवादी संघटनांची पाळेमुळे महाडपर्यंत पोहोचल्याने परिसरात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे या कारवाईबाबत रायगड व स्थानिक पोलिसांना कोणतीच माहिती नसल्याचे पुढे आले आहे. महाडमधील बांधकाम व्यवसाय, एमआयडीसी, रेती व्यवसाय, फळ विक्रेते या व्यवसायात अनेक परप्रांतीय काम करत आहेेत. याबाबत पुणे एटीएसने गोपनीयतेच्या नावाखाली सविस्तर माहिती देण्यास नकार दिला.

मुंबई, दिल्ली आणि कोलकाता येथे घातपात घडविण्याच्या तयारीत असलेल्या ‘एबीटी’च्या तीन दहशतवाद्यांना पुण्यातून तर दोघांना मुंबईतून पुणे एटीएसने ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार महाड येथेही या संघटनेच्या सदस्यांचे असलेले वास्तव्य समोर आले होते. त्या माहितीच्या आधारे एटीएसच्या पथकाने महाडमधून एका संशयिताला ताब्यात घेतल्याचे समजते. त्याला महाड न्यायालयात हजर केले असता 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 

Tags : terrorist, mahad, connection, Mumbai news  

Back to top button