अंबाबाई मंदिरात आता सरकारी पुजारी; विधेयक मंजूर | पुढारी

अंबाबाई मंदिरात आता सरकारी पुजारी; विधेयक मंजूर

मुंबई : विशेष प्रतिनिधी

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचे विधेयक विधानसभेत आज एकमताने मंजूर झाले. विधेयक मंजूर झाल्यामुळे पुढे मंदिरात राज्यस्तरीय परीक्षा घेऊन सरकारी पुजारी नेमण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आता हे विधेयक विधान परिषदेत मंजुरीसाठी जाणार असून, तेथे सर्वानुमते मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक राज्यपालांच्या सहीसाठी जाईल. राज्यपालांची सही झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होणार आहे. 

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या धर्तीवर सरकारी पुजारी नेमावेत, यासाठी कोल्हापुरात जनआंदोलन उभे राहिले होते. त्याची दखल घेत, विधिमंडळात श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदीर कोल्हापूर विधेयक मांडण्यात आले. त्याला विधानसभेत मंजुरी मिळाली आहे. या विधेयकानुसार सध्या मंदिरात असलेल्या पुजाऱ्यांचे हक्क संपुष्टात येणार आहेत. राज्यस्तरीय परीक्षा घेऊन मंदिरातील पुजाऱ्यांची नेमणूक होणार आहे. यात ५० टक्के महिलांचा समावेश असेल. 

तसेच मंदिर व्यवस्थापनाकडून कोल्हापुरातील शाहू वैदीक विद्यालयाला मदत करण्यात येणार असून, तेथील विद्यार्थ्यांना मंदिरातील नेमणुकीसाठी प्राधान्य मिळणार आहे. पुजाऱ्यांचे हक्क संपुष्टात आल्याने त्यांच्या नुकसान भरपाईबाबत राजर्षी शाहू महाराजांनी सांगितलेल्या नियमांचे पालन होणार आहे. आता हे विधेयक विधानपरिषदेत जाऊन पुढे त्याचे कायद्यात रुपांतर केव्हा होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags : vidhan sabha, kolhapur , kolhapur news, ambabai temple, priests government priests, pandharpur, ambabai

Back to top button