‘ऑलिव्ह रिडले’ची 3852 अंडी संरक्षित | पुढारी

‘ऑलिव्ह रिडले’ची 3852 अंडी संरक्षित

दापोली : पुढारी वृत्तसेवा

दापोली येथील 7 समुद्र किनार्‍यांवर समुद्री कासवाची ऑलिव्ह रिडले जातीची 36 घरटी सापडली आहेत. यात एकूण 3 हजार 852 अंडी वन विभागाकडून 

कासवमित्रांच्या मदतीने संरक्षित करण्यात आली आहेत.  

समुद्र किनारी थंडीच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला ऑलिव्ह रिडले या समुद्र कासवांची अंडी संरक्षित करण्यात येतात. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दापोली तालुका परिमंडळ वनक्षेत्र कार्यालयाकडून कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी मोहीम हाती घेऊन ती यशस्वीरीत्या राबविली जात आहे. वनपरिक्षेत्र मंडळ, दापोलीने या राबविलेल्या कासव संरक्षण आणि संवर्धन मोहिमेला कासवमित्रांसह नागरिकही सहकार्य करत आहेत.  

दापोली तालुक्यातील किनारी भागातील केळशी येथे 4 घरटी असून त्यामध्ये 447 अंडी,  मुरूडमध्ये 8 घरटी व 872 अंडी, कोळथरेत 6 घरटी व 468 अंडी, आंजर्लेत 6 घरटी 769 अंडी, कर्देत 3 घरटी, 315 अंडी, दाभोळमध्ये 7 घरटी, 764 अंडी, लाडघर येथे 2 घरटी, 217 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. 55 ते 60 दिवसांनी या अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात. 

दापोलीचे वन परिमंडळ क्षेत्रअधिकारी वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गणेश खेडेकर यांच्यासह वनरक्षक तसेच प्रत्येक गावातील कासवमित्र याकामी मेहनत घेत आहेत. कासव संरक्षणाकरिता अभियान राबविण्यात येत असल्यामुळे याचा फायदा समुद्र कासवांना झाला आहे. त्यामुळे वेळीच अंडी कासवमित्रांच्या निदर्शनास येत असल्यामुळे व सर्तकतेमुळे कासवाची अंडी संरक्षीत करण्यात यश मिळत असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

 

Back to top button