पहिला चहा : केस गळायचे तर थांबतातच… | पुढारी

पहिला चहा : केस गळायचे तर थांबतातच...

काय प्रॉब्लेम? टक्‍कल पडलंय? काळजी कसली करताय? तेल लावायला नको की टक्‍कलावर केशारोपण नको. ऑर्डर बुक करा आणि केसांचा टोप दुसर्‍या दिवशी तुमच्या दारात हजर. झोपताना काढला नाही तरी चालतो. एकही केस कमी होत नाही. आता दुसरी जाहिरात ऐका, ‘आमचे तेल एकदा वापरून बघा. केस गळायचे तर थांबतातच उलट केस काळे होऊन वाढतातही भरपूर!’ ही जाहिरात लागल्यावर टीव्हीवर दुसरी जाहिरात लागते, ‘ग्राहकराजा जागा हो! भूलथापांना फसू नको!’ तेलाची जाहिरात बघून आधीच ग्राहकराजाच्या डोळ्यावर झोप आलेली असते.

एवढ्यात तिसरी जाहिरात, ‘गुडघेदुखीने बेजार आहात? आमच्या गोळ्यांचा कोर्स करा. हसत खेळत जीना चढा! (उतरला नाही तरी चालेल.) मांडी घालून जेवायला बसा!’ ही जाहिरात बघून सोपानरावांनी त्या कंपनीची गोळी खाऊन जी मांडी घातली ती कायमचीच! आता या ग्राहकराजाने दाद मागायची तरी कुणाकडे? ‘अदालत उठ गई है अब, करेगा कौन सुनवाई..’ अशी त्याची गत होते. एकीकडे ग्राहकाला राजा म्हणायचे आणि दुसरीकडे या ना त्या युक्‍तीने त्याचा खिसा रिकामा करून त्याला एकदम भिकारी करायचे चालले आहे. आता ही एक चौथी जाहिरात बघा, ‘स्वप्नातले घर हवे आहे?

एकदम निसर्गाच्या सानिध्यात!’ अशी जाहिरात वाचून बबनरावांनी नदीकाठी बांधलेल्या अपार्टमेंटमध्ये एक सदनिका विकत घेतली आणि त्याच वर्षी सरासरीपेक्षा तिप्पट पाऊस झाला आणि अपार्टमेंटच्या तिसर्‍या मजल्यापर्यंत पाणी आले. मग, बबनरावांना वाचविण्यासाठी आणि त्यांच्या त्या स्वप्नातील घरातून खाली उतरून घेण्यासाठी आर्मीच्या जवानांना नौका घेऊन तिथपर्यंत जावे लागले. अशा या ग्राहकराजाला कधी तरी मटण खाण्याचीही हुक्‍की येते. त्याला बोलण्याच्या नादात गुंतवून मटणात चरबी किती घातली ते समजू दिले जात नाही. कधी कधी बकर्‍याची शेपूटही त्याच्या वाट्याला येऊ शकते. आणखी एक जाहिरात बघा, ‘येथे निर्भेळ म्हशीचे शुद्ध दूध मिळेल’ अशी पाटी न लावता जागेवर दूध पिळून देणार्‍या मंडळींकडून पिळून घेतलेले एक लिटर दूध घरापर्यंत पोहोचेपर्यंत अर्धा ते पाऊण लिटरच भरते. मॅट्रिकला पोरगा पास झाला म्हणून घेतलेले कंदी पेढे हे कधी कधी कंदी असतात. नाही तर भेसळीचेच असतात. आपण ग्राहकादिनानिमित्त वजन, माप, गुणवत्ता व सेवा या विषयांवर खूप चर्चा करतो. ती मात्र शुद्ध आणि निर्भेळ असते.

Back to top button