युवकांनी शाहू विचारांचा अंगीकार करावा – डॉ. यशवंतराव थोरात | पुढारी

युवकांनी शाहू विचारांचा अंगीकार करावा - डॉ. यशवंतराव थोरात

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
राजर्षी शाहू महाराज द्रष्टे राजे होते. शंभर वर्षांपूर्वीच्या तत्कालीन परिस्थितीत त्यांनी समतेसाठी लढा दिला. त्यांच्या एकूणच सामाजिक, सर्वांगीण विचारांचा युवकांनीअंगीकार करावा, असे आवाहन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. यशवंतराव थोरात यांनी केले.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे गुरुवारी जिल्हाभरात ‘जागर शाहू कर्तृत्वाचा’ या शीर्षांतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्याविषयी एकाच वेळी शंभर व्याख्यानांचे आयोजन केले. या विशेष व्याख्यानमालेतील प्रमुख व्याख्यानांतर्गत ‘राजर्षी शाहू छत्रपती-जीवन कार्य’ या विषयावर डॉ. थोरात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते. याप्रसंगी शाहू महाराज, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषद
प्रशासक संजयसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.

डॉ. थोरात म्हणाले, खर्‍या अर्थाने जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होणारे राजे म्हणून शाहू महाराजांचा उल्‍लेख करावा लागेल. बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी महाराजांनी शिक्षणाचे दरवाजे खुले केले होते. महाराजांच्या तत्कालीन समाज विषयक धोरणांचा समाजावर काय प्रभाव पडला आहे यावर संशोधकांनी, अभ्यासकांनी जरूर प्रकाश टाकावा, असे आवाहन डॉ. थोरात यांनी केले. शाहू महाराज म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे समतेचे, मानवतावादाचे, समाजविषयक विचार थांबता कामा नयेत. ते विचार प्रत्यक्ष कृतीत यावेत. केंद्र व राज्य सरकारने शाहू विचारांवर कार्यरत राहावे. तीच महाराजांना खर्‍या अर्थाने आदरांजली ठरेल. अध्यक्षीय भाषणात डॉ. पवार म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा राजदंड खर्‍या अर्थाने बहुजनांच्या उत्थानासाठी वापरला. हा राजदंड वापरणारे ते एकमेव राजे होते. महाराजांच्या अंगी साधुत्व होते. तत्कालीन सामाजिक नकाशा बदलण्याचे काम शाहू महाराजांनी केले. प्रास्ताविक डॉ. भारती पाटील यांनी केले. कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर सिद्धनेर्ली येथील शाहीर सदाशिव निकम यांनी शाहू महाराजांचा पोवाडा सादर केला.

शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा वृद्धिंगत करून समतेचा संदेश आत्मसात करूया : पालकमंत्री

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेले कार्य व त्यांचे विचार पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत. शाहू महाराजांनी दिलेला समतेचा संदेश आचरणात आणून शाहू विचारांचा जागर करूया. बलशाली समाज, राष्ट्र घडविण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, अशी साद पालकमंत्री सतेज पाटील यांनी विवेकानंद महाविद्यालय येथे आयोजित व्याख्यानात बोलताना घातली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्राचार्य आर.आर. कुंभार, महादेव नरके, प्रा. एस.एस. अंकुशराव, डॉ. श्रुती जोशी उपस्थित होत्या. राजर्षी शाहूंच्या कार्यातील मानवतावादी मूल्ये समजावून घेणे आवश्यक : कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यातील मानवतावादी मूल्ये आजच्या पिढीने समजावून घेतली पाहिजेत आणि ही मूल्ये सोबत घेऊनच आयुष्यात वाटचाल केली पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी रूकडी येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय येथे केले.विशेष व्याख्यानमालेंतर्गत कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे होते. डॉ. शिर्के म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याची व्याप्‍ती मोठी आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाच्या उत्थानाची आस त्यांच्या मनी होती. समाजाच्या दुःखाशी एकरूप होऊन ती दुःखे दूर करणारा हा राजा होता, म्हणूनच ते लोकराजा व राजर्षी म्हणून लोकमान्यता पावले.

विद्यार्थ्यांनी शाहू विचारांचे दूत बनावे : प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे. त्याद‍ृष्टीने विद्यार्थ्यांनी शाहू विचार आत्मसात करून त्यांचे विचारदूत बनले पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील यांनी केले. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांचे ‘राजर्षी शाहू महाराज यांचा पर्यावरणविषयक द‍ृष्टिकोन’ या विषयावर व्याख्यान झाले. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. एस.आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमधील एस. जी. एम. कॉलेजमध्ये शाहू राजांबद्दल विचार मांडले.

शंभर नव्हे, 350 व्याख्याने!
एकाच वेळी शहर व जिल्ह्यात शंभर ठिकाणी व्याख्यानांचे आयोजन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. शाहू महाराजांच्या प्रेमापोटी तब्बल 350 ठिकाणी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

Back to top button