नागपूर क्राईम : रिक्षाचालक व हमालांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार | पुढारी

नागपूर क्राईम : रिक्षाचालक व हमालांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नागपूर, पुढारी ऑनलाईन : अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालक आणि हमालांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली.

सविस्तर वृत्त असे की, पीडित मुलगी गुरूवार (२९ जुलै) रोजी घरातून निघून रेल्वेस्थानकावर आली. मात्र, पुरेसे पैसे नसल्याने ती रेल्वेस्थानकाच्या बाहेर जाऊ शकली नाही. त्याच वेळी दोन रिक्षाचालकांनी तिला मदत करण्याच्या बहाण्याने त्याच्या खोलीवर नेले.

तिथे अन्य एक रिक्षाचालक मित्रासह आणखी एकाला बोलावून घेतले. या चौघांपैकी दोघांनी गुरूवारी रात्री तिच्यावर बलात्कार केला, तर दोघांनी मेयो चौकातील मेट्रो उड्डाणपुलाखाली ऑटोत बलात्कार करून शुक्रवारी पहाटे तिला मेयो रूग्णालयाजवळ सोडून दिले.

मेयोजवळ एकटीच बसलेल्या या मुलीला काही लोकांनी परत रेल्वेस्थानकावर आणून सोडले. रेल्वे अधिकाऱ्यांनी तिची वैद्यकीय आणि कोरोना तपासणी करून तिला आशा किरण बालगृहात दाखल केले. ही मुलगी दोन दिवस आशा किरण बालगृहात होती.

बालगृहाच्या अधिक्षांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिथे तिच्याबाबत घडलेला प्रसंग सांगितला. त्यानंतर आरपीएफने चाईल्ड लाईन कर्मचारी व बालगृहाच्या अधिक्षिकेसमक्ष तिचा जबाब नोंदवून घेतला.

त्यानंतर रेल्वे पोलिस अधिक्षक मनीषा काशिद यांनी आरोपींना ताब्यात घेतले. घटनास्थळ बर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तिथे सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

पहा व्हिडीओ : हिरण्यकेशीकाठी अश्मयुगीन संस्कृतीच्या पाऊलखुणा

Back to top button