संकटांना ‘नॉकआउट पंच’ देणारी बाॅक्‍सर पूजा राणी | पुढारी

संकटांना 'नॉकआउट पंच' देणारी बाॅक्‍सर पूजा राणी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ‘बॉक्‍सिंग हा खेळ महिलांसाठी नाहीच. आक्रमक व्‍यक्‍तिमत्‍व असणार्‍यांनीच तो खेळावा. कुठं या हाणामारीच्‍या खेळात पडतेस. तुला दुखापत होईल. हा खेळ तुझ्‍यासाठी नाही’. अशा शब्‍दात तिला वडिलांनी नाउमेद केले. तरीही ती खेळत राहिली. अनेक संकट आली. या संकटांना जोरदार ‘पंच’ लगावत तिने स्‍वत:ला सिद्‍ध केलेच. या खेळाडूचे नाव आहे पूजा राणी बूरा. टोकियो ऑलिम्‍पिकमध्‍ये उपांत्‍यपूर्व फेरीत तिचा पराभव झाला आहे. ती स्‍पर्धेतून बाहेर पडली असली तरी ऑलिम्‍पिकसाठी पात्र ठरणे हाच क्रीडा क्षेत्रात बहुमान असताे. त्‍यामुळेच पूजा राणीचा आजवरचा प्रवास हा देशातील भावी महिला खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

म्‍हणून दुखापती लपवल्‍या…

पूजा राणी बूराचा जन्‍म१७ फेब्रुवारी १९९१रोजी हरियाणातील भिवानी जिल्‍ह्यातील निमरीवाली गावातील एका जाट कुटुंबात झाला.

लहानपणापासून तिला खेळाची आवड. शाळेत असताना तिने बॉक्‍सिंग खेळात करीअर करायचे ठरवले. पूजाचे वडील पोलीस अधिकारी होते. घरात त्‍यांचा दरार होता.आपल्‍या मुलीने बॉक्‍सिंग खेळू नये, असे त्‍याचे मत होते.

बॉक्‍सिंग खेळास घरातून विरोध होणार हे पूजाला माहित होते. त्‍यामुळे तिने आईवडिलांना न सांगताच शाळेत आपला सराव सुरु केला.

सराव करताना तिला दुखापत होत असे. आपल्‍या झालेली दुखापत कोणालाही समजू नये यासाठी तिची धडपड असे. असे एक वर्ष सुरु होते. अखेर वडिलांना माहिती मिळाली.

‘बॉक्‍सिंग हा मुळात महिलांचा खेळच नाही. आक्रमक व्‍यक्‍तिमत्‍व असणार्‍यांनीच तो खेळावा. तुला दुखापत होईल. हा खेळ तुझ्‍यासाठी नाही’. अशा शब्‍दात वडिलांनी तिला नाउमेद केले होते. तसेच तिची शाळाही काही काळासाठी बंद केली होती, अशी माहिती पूजा राणीने एका मुलाखतीवेळी दिली होती.

पूजासाठी बॉक्‍सिंग केवळ खेळ नाही तर ध्‍यास आहे. बॉक्‍सिंगमध्‍येच करीअर करायचे हा तिचा निर्धार कायम होता. अखेर तिचे प्रशिक्षक संजय कुमार श्‍योराण यांनी वडिलांची समजूत काढली.  शाळा आणि बॉक्‍सिंग सराव पुन्‍हा सुरु झाला.

२००९मध्‍ये हरियाणा राज्‍य स्‍पर्धेत तिने रौप्‍य पदक पटकावत आपले अस्‍तित्‍व सिद्‍ध केले. या यशानंतर वडिलांसह कुटुंबातील अन्‍य सदस्‍यांनी तिला पाठिंबा दिला.

विजयाची मालिका सुरु

२०१२च्‍या दक्षिण आयिशाई स्‍पर्धेत तिने रौप्‍य पदकाला गवसणी घातली. यानंतर २०१४ हे वर्ष पूजा राणीसाठी महत्‍वाचे होते. २०१४ च्‍या राष्‍ट्रकूल स्‍पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्‍व केले. २०१४ आशियाई क्रीडा स्‍पर्धेत तिने कांस्‍य पदक पटकावले. याच वर्षी तिने आशियाई क्रीडा स्‍पर्धेत कांस्‍य पदक मिळवले. २०१६मध्‍ये दक्षिण आशियाई स्‍पर्धेत तिने सुवर्ण पदकावर मोहर उमटवी.

खांद्‍याला दुखापत… हातही भाजला

पूजा राणीच्‍या आजवरचा क्रीडा प्रवासामध्‍ये अनेक चढ-उतार आले आहेत. सुरुवातीच्‍या काळात तिला यश मिळाले. मात्र यापुढे संयम आणि खेळाप्रती असणार्‍या समर्पणाची परीक्षा होणार होती.

२०१६मधील रिया ऑलिम्‍पिक स्‍पर्धेत सहभागी होण्‍यासाठी पूजा राणी अपात्र ठरली. २०१६च्‍या महिला विश्‍चचषक स्‍पर्धेत दुसर्‍याच फेरीत ती पराभूत झाली. २०१६मध्‍ये दिवाळीत फटाके उडविताना तिचा हात भाजला

. यातच २०१६च्‍या ऑलिम्‍पिकसाठी ती पात्र ठरु शकली नाही. २०१७मध्‍ये तिच्‍या खांदाला गंभीर दुखापत झाली होती. या काळात पूजा राणीचे करिअर संपणार, असा अंदाजही काहींनी व्‍यक्‍त केला होता.

सहा महिन्‍यात पुन्‍हा भरारी…

अवघ्‍या सहा महिन्‍यांमध्‍ये सर्व संकटांवर मात करत पूजा पुन्‍हा उभारली. ती टोकियो ऑलिम्‍पिकसाठी पात्र ठरली. मात्र उपांत्‍यपूर्व फेरीत चीनच्‍या ली कियान हिचा पराभव केला.

पूजा राणी टोकियो ऑलिम्‍पिक स्‍पर्धेतून बाहेर पडली असली तरी तिने संकटांना ‘पंच’ मारत आजवर केलेला प्रवास हा देशातील खेळात करीअर करणार्‍या मुलींसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

हेही वाचलं का ?

पाहा व्‍हिडीओ :तेजस्विनी सावंतची पुढारी साठी विशेष मुलाखत 

 

Back to top button