सातासमुद्रापार अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा जागर | पुढारी

सातासमुद्रापार अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा जागर

कोल्हापूर : प्रवीण मस्के : ‘माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली’ या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या गीताने संयुक्‍त महाराष्ट्र चळवळीतील अनेकांना लढण्याचे बळ दिले. त्याच लोकशाहिराच्या विचाराचा जागर सातासमुद्रापार सात देशांमध्ये केला जाणार आहे. कोल्हापुरातील महावीर महाविद्यालयातील प्रा. डॉ. शरद गायकवाड यांच्या संकल्पनेतून पहिलाच ऑनलाईन अनोखा उपक्रम त्यांच्या जयंतीदिवशी (1 ऑगस्ट) राबविला जाणार आहे.

तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णा भाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव येथे झाला. मराठी साहित्यातील लोकवाङ्मय, कथा, नाट्य, लोकनृत्य, कादंबर्‍या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्व प्रकार त्यांनी समृद्ध केले. तमाशा लोककलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय त्यांनाच जाते. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. संयुक्‍त महाराष्ट्र चळवळ, गोवामुक्‍ती संग्राम चळवळीत त्यांनी प्रत्यक्ष व शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.

1 ऑगस्ट रोजी अण्णा भाऊ साठे यांची जयंती मॉरिशस, दुबई, जर्मनी, सिंगापूर, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिकेत साजरी केली जाणार आहे.
यानिमित्त प्रा. डॉ. शरद गायकवाड, डॉ. होमराजन गोवरिया, पूर्वशा सखू, किशोर मुंडे, महेश बारवकर, शैलेश दामले, राजीव तेरवडकर आणि विशाल रजपूत हे अण्णा भाऊ साठे यांच्यासंबंधी जागतिक स्तरावर विचार मांडणार आहेत.

मॉरिशस येथील माजी मराठी विभागप्रमुख डॉ. बिदन आबा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य
जगभरातील 27 देशांच्या विविध राष्ट्रभाषांमधून अनुवादित झाले आहे. अण्णा भाऊ यांच्या साहित्यातील व व्यक्‍तिमत्त्वातील विविध पैलूंवर तज्ज्ञ प्रकाशझोत टाकणार आहेत. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय जाणीव, समाजभान याचा आढावा यानिमित्ताने घेतला जाणार आहे.

वविधांगी पैलूंचा आढावा

संयुक्‍त महाराष्ट्र चळवळ हा महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय चळवळीचा रोमहर्षक असा लढा आहे. या लोकलढ्याची व्याप्ती आणि विस्तार बहुल स्वरूपाचा होता. संयुक्‍त महाराष्ट्राची चळवळ आणि अण्णा भाऊ साठे यांचे योगदान, त्यांचा सहभाग, राजकीय व सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वाचा पैलू याविषयी प्रा. डॉ. शरद गायकवाड यांनी ‘संयुक्‍त महाराष्ट्र चळवळ आणि अण्णा भाऊ साठे’ पुस्तकातून विस्तृत आढावा घेतला आहे.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची 101 वी जंयती सातारा येथील स्वप्न स्टडिजचे दिलीप पुराणिक व स्वप्निल पुराणिक यांच्या पुढाकारातून आंतरराष्ट्रीय स्तरावर विचारमंथन करून ऑनलाईन पद्धतीने साजरी केली जाणार आहे. अण्णा भाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील साहित्यातील मानवी मूल्य यातून मांडले जाणार आहे. अण्णा भाऊंच्या वैश्‍विक कार्यकर्तृत्वाला यातून वैचारिक अभिवादन करण्याचा हा प्रयत्न आहे.

– प्रा. डॉ. शरद गायकवाड, तज्ज्ञ सदस्य, अण्णा भाऊ साठे चरित्र साधन समिती, महाराष्ट्र राज्य

Back to top button