अफगाणिस्तानातील कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळ रॉकेट हल्ल्याने हादरले | पुढारी

अफगाणिस्तानातील कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळ रॉकेट हल्ल्याने हादरले

काबूल; पुढारी ऑनलाईन : अफगाणिस्तानातील कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळ रॉकेट हल्ल्याने हादरले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विमानतळावर तीन रॉकेट डागण्यात आले. त्यातील दोन धावपट्टीवर पडले आणि स्फोट झाला.

कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रमुख मसूद पश्तून यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, धावपट्टी दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. हे काम आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

काल रात्री झालेल्या या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. हल्ल्यानंतर सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या हल्ल्यामागे तालिबानचा हात असल्याचे मानले जाते, कारण हा हल्ला अशा वेळी झाला आहे जेव्हा तालिबान लढाऊंनी हेरात, लष्कर गाह आणि कंधारला चारही बाजूंनी घेरले आहे. सध्या त्याचे अफगाण सुरक्षा दलांसोबतचे युद्ध कंधारमध्ये सुरू आहे.

कंधार हे अफगाणिस्तानमधील दुसरे मोठे शहर आहे. येथील विमानतळाचा वापर अफगाण सैन्याला शस्त्रे आणि रसद पाठवण्यासाठी केला जातो. म्हणूनच तालिबानला या विमानतळावर कब्जा करून अफगाण सैन्याला मदत थांबवायची आहे. गेल्या 2-3 आठवड्यांत तालिबानने या भागात हल्ले वाढवले ​​आहेत.

अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संरक्षण सुरक्षा दलांनी अमेरिकेच्या मदतीने तालिबानच्या ताब्यात असलेली अनेक गावे रिकामी केली आहेत.

सैन्याच्या कारवाईनंतर हे स्पष्ट झाले आहे की तालिबानच्या हिंसाचारात पाकिस्तानी लढाऊ देखील तितकेच सहभागी आहेत.

चकमकीदरम्यान, अशा अनेक सैनिकांना अफगाण सैन्याने ठार केले आहे, जे पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी आहेत. त्यांच्याकडून पाकिस्तानी ओळखपत्रेही सापडली आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button