

मुंबई; पुढारी ऑनलाईन : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर, माहीममध्ये येऊन भाजप नेते प्रसाद लाड यांनी वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, असे चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे शिवसैनिक कमालीचे संतापले आहेत.
शिवसेना भवन हे आमचे मंदिर आहे. भाजपचे नेते याआधीही सेनाभवनावर येऊन भुंकले होते. शिवसैनिक कट्टर असून त्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही. शिवसेना भवन फोडायचे सोडाच शिवसेना भवनाच्या फुटपाथवर तर येऊन बघा, तंगड्या तोडून हातात देऊ, असा दमच शिवसेना नेत्यांनी भाजपला भरला.
आता या प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसाद लाड यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी ट्विट करून लाड यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही.(समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?
भाजपच्या दादर येथील कार्यालयाचे आमदार नितेश राणे व प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत शनिवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी लाड व राणे यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला.
माहीम विधानसभा मतदारसंघात भाजपचे किमान 5 नगरसेवक निवडून आणणार, किल्ला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. बाकी शिवसेनेचे बालेकिल्ले आम्ही पाडून टाकू, असे लाड यांनी ठणकावून सांगितले.
शिवसेनेला ताकद देण्याचे काम आम्ही केले. आता त्यांची ताकद तोडायचे काम आम्ही करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शिवसेनेला वाटते की, आम्ही माहीममध्ये आल्यावर सेनाभवन फोडू, पण त्यांना सांगतो की, वेळ आली तर आम्ही सेनाभवनही फोडू, असे चिथावणीखोर वक्तव्य लाड यांनी यावेळी केले.
शिवसेनेकडून आक्रमक प्रत्युत्तराचा प्रसाद मिळताच लाड यांनी रात्री उशिरा सारवासारव करीत दिलगिरी व्यक्त केली.
आम्ही माहीममध्ये आलो की जणू सेना भवन फोडायला आलो आहोत असा बंदोबस्त लावला जातो.
या माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात आला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बांधलेल्या वास्तूचा मला अनादर करायचा नव्हता.
तरी माझ्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे ते म्हणाले.
हे ही वाचलं का?