

कोल्हापूर, पुढारी ऑनलाईन : पुणे- बेंगलोर महामार्गावर कोगनोळी नाक्यावर कर्नाटक सरकारची मनमानी सुरू सीमाभागाची कोंडी केली आहे. पुणे- बेंगलोर महामार्गावरील वाहनधारकांसाठी कोरोनाबाबत तातत्याने नियमावली बदलून सीमाभागाची कोंडी करत वाहनधारकांना वेठीस धरले जात आहे.
कर्नाटक सरकारच्या या आठमुठ्या धोरणामुळे सीमाभागातील जनतेसह चार जिल्ह्यातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कर्नाटक सरकारने मनमानी पद्धतीने महामार्ग रोखल्याने वाहनधारकांना लांबचा प्रवास करून इच्छित स्थळी जावे लागत आहे.
पुणे- बेंगालोर महामार्गावर कोगनोळी नाक्याजवळ कर्नाटक सरकारने चेकपोस्ट तयार केला आहे.
महामार्गावरून जाणारी वाहतूक येथे थांबविली जाते.
कोल्हापुरातून कागल, गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा या तालुक्यांत जाण्यासाठी महामार्गावरून प्रवास करावा लागतो.
मात्र कोल्हापुरातून आजरा, गडहिंग्लज, चंदगड आणि गोव्याकडे जाताना कोगनोळीपासून कर्नाटकची सीमा लागते.
पुढे बुगटे आलूर ओलांडल्यानंतर ही हद्द संपते.
मधेच कर्नाटकची सीमा लागत असल्याने या पटट्यात नेहमीच पोलिसांची अरेरावी सुरू असते.
केव्हाही वाहतूक पोलिस वाहने आडवी लावून वाहनधारकांना अडवून विविध कागदपत्रांची मागणी करतात.
एम एच ०९ नंबर प्लेटच्या वाहनांना अधिक लक्ष्य केले जाते. कोरोनाचा प्रकोप वाढल्यानंतर सर्वत्र दक्षता घेतली जात होती.
कर्नाटक सरकारने कोगनोळी नाक्यावर तपासणी नाका तयार केला.
त्यामुळे कोल्हापुरातून महाराष्ट्रात जाणारी वाहने येथे अडवली जाऊ लागली.
आजरा, गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्यातून दररोज कोल्हापुरात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
या मार्गावरून महाराष्ट्राची बसवाहतूकही होते. मात्र, गेले वर्षभर ही बसवाहतूक सेनापती कापशी, हमीदवाडा किंवा सेनापती कापशी, मूरगूड मार्गे सुरू आहे.
ही वाहतूक वेळखाऊ आणि आर्थिक भुर्दंड घालणारी आहे.
मात्र, कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे सीमाभागातील नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे.
देशभरात लॉकडाऊन उठले असले तरी कर्नाटक सरकार आपला हेका सोडायला तयार नाही.
महामार्गावर सरसकट सर्वच वाहने रोखून धरत सर्वांकडे आरटीपीसीआर टेस्टची मागणी केली आहे.
वास्तविक दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मागणी कितपत व्यवहार्य आहे याचाही विचार केला जात नाही.
प्रवाशांनी कितीही विनंती केली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
वास्तविक महामार्गावर कर्नाटकातील मोजकी गावे आणि शहरे लागतात. त्या ठिकाणी तपासणी नाके लावणे शक्य आहे.
शिवाय तवंदी घाटातून पश्चिमेकडे आजरा रोड जातो. त्या ठिकाणी कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांची तपासणी करणे शक्य आहे.
मात्र, या व्यवहार्य पर्यायाकडे ना कर्नाटक सरकार लक्ष देतेय, ना कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी लक्ष देत आहेत.
या अनास्थेमुळे प्रवाशी नाहक त्रास सहन करत आहे. अनेक वाहनधारक चंदगडला जाण्यासाठी कळंबा,
इस्पूर्ली, मुदाळ तिठ्ठा, मूरगूड, सेनापती कापशी, माद्याळ, कडगाव, गडहिंग्लजमार्गे जात आहेत.
तर काही वाहनधारक कागल, हमीदवाडा, सेनापती कापशीमार्गे गडहिंग्लज, चंदगड आणि आजऱ्याला जात आहेत.
वास्तविक हा मार्ग अरुंद असल्याने आणि पावसामुळे अनेक रस्त्यांची दुर्दशा झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
कर्नाटक पोलिसांनी कोल्हापूर पासिंगच्या गाड्यांवर लक्ष्य ठेवले जाते.
या वाहनधारकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात पोलिस आघाडीवर असतात.
सध्या कोरोनाचे कारण देऊन वाहनधारकांना लांबचा प्रवास करण्यास भाग पाडले जात आहे.
महामार्ग रोखून एकप्रकारे सीमाभागाची कोंडी केली आहे.
हेही वाचा :
पहा व्हिडिओ: स्वारगेट- बुधवार पेठ टनेलचे काम सुरू