CSK vs PBKS : पंजाबचा चेन्नईवर 7 गडी राखून सहज विजय | पुढारी

CSK vs PBKS : पंजाबचा चेन्नईवर 7 गडी राखून सहज विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : जॉनी बेअरस्टो आणि रिले रोसो यांच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा सात गडी राखून पराभव केला. पंजाबचा हा सलग दुसरा विजय आहे. याआधी संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) पराभव केला होता. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार रुतुराज गायकवाडच्या 62 धावांच्या जोरावर 20 षटकांत सात गडी गमावून 162 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबकडून बेअरस्टोने 46 धावा आणि रिले रॉसॉवने 43 धावा केल्या, ज्याच्या जोरावर पंजाबने 17.5 षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात 163 धावा करून विजय मिळवला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईला ऋतुराज आणि अजिंक्य रहाणे या सलामीच्या जोडीने दमदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी हरप्रीत ब्रारने 29 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या रहाणेला बाद करून मोडली.

यानंतर ब्रारने त्याच षटकात शिवम दुबेला आपला बळी बनवले. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. चहरने जडेजाला बाद केल्याने चेन्नईचा डाव गडगडला. चेन्नईला चांगली सुरुवात पुढे नेता आली नाही आणि अवघ्या सहा धावांत तीन गडी गमावले.

एका बाजूने विकेट्स पडत असताना मध्ये कर्णधार ऋतुराजने पुन्हा एकदा संयमी खेळी करत अर्धशतक झळकावले. ऋतुराजच्या खेळीच्या जोरावरच संघाला दीडशे धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले. त्याला समीर रिझवी आणि मोईन अली यांनी साथ दिली, पण पंजाबच्या गोलंदाजांसमोर चेन्नईची फलंदाजी फारशी धावा करू शकली नाही. शेवटी महेंद्रसिंग धोनीने काही फटके मारले, पण शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेताना तो धावबाद झाला. यामुळे चेन्नई डाव 162 धावांवर आटोपला.

Back to top button