CSK vs PBKS : चेन्नईचे पंजाबला 163 धावांचे आव्हान | पुढारी

CSK vs PBKS : चेन्नईचे पंजाबला 163 धावांचे आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क :  कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जला 163 धावांचे लक्ष्य दिले. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईसाठी ऋतुराजने 48 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 62 धावा केल्या, त्या जोरावर चेन्नईने 20 षटकांत सात गडी गमावून 162 धावा केल्या. पंजाबकडून हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नईला ऋतुराज आणि अजिंक्य रहाणे या सलामीच्या जोडीने दमदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी हरप्रीत ब्रारने 29 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतलेल्या रहाणेला बाद करून मोडली.

यानंतर ब्रारने त्याच षटकात शिवम दुबेला आपला बळी बनवले. तो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. चहरने जडेजाला बाद केल्याने चेन्नईचा डाव गडगडला. चेन्नईला चांगली सुरुवात पुढे नेता आली नाही आणि अवघ्या सहा धावांत तीन गडी गमावले.

एका बाजूने विकेट्स पडत असताना मध्ये कर्णधार ऋतुराजने पुन्हा एकदा संयमी खेळी करत अर्धशतक झळकावले. ऋतुराजच्या खेळीच्या जोरावरच संघाला दीडशे धावांचा टप्पा ओलांडण्यात यश आले. त्याला समीर रिझवी आणि मोईन अली यांनी साथ दिली, पण पंजाबच्या गोलंदाजांसमोर चेन्नईची फलंदाजी फारशी धावा करू शकली नाही. शेवटी महेंद्रसिंग धोनीने काही फटके मारले, पण शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेताना तो धावबाद झाला. यामुळे चेन्नई डाव 162 धावांवर आटोपला.
 

हेही वाचा : 

Back to top button