Asian Wrestling Championships 2024 | आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या उदितला रौप्य; अभिमन्यू, विकीला कांस्य | पुढारी

Asian Wrestling Championships 2024 | आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या उदितला रौप्य; अभिमन्यू, विकीला कांस्य

पुढारी ऑनलाईन : भारताच्या १९ वर्षीय उदित याने किर्गिस्तानमधील बिश्केक येथे झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप २०२४ मध्ये पुरुषांच्या ५७ किलो गटात रौप्यपदक जिंकले. तर पुरुषांच्या ७० किलो वजन गटात अभिमन्यू आणि ९७ किलो वजन गटात विकी यांनी कांस्यपदक मिळवले. या स्पर्धेत आतापर्यंत भारताच्या पदकांची संख्या तीन झाली आहे. (Asian Wrestling Championships 2024)

पुरुष फ्रीस्टाइलमध्ये एकूण पाच भारतीय कुस्तीपटू गुरुवारी आखाड्यात उतरले होते. पण रोहित (६७ किलो) आणि परविंदर सिंग (७९ किलो) यांना पोडियम फिनिश करता आले नाही.

U20 आशियाई चॅम्पियन असलेल्या उदितने पात्रता फेरीत इराणच्या इब्राहिम महदी खारी याचा १०-८ असा पराभव केला होता. त्याने उपांत्यपूर्व फेरीत किर्गिस्तानच्या अल्माझ स्मानबेकोव्हचा ६-४ असा पराभव केला आणि उपांत्य फेरीत त्याने डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कोरियाच्या किम कुम ह्योक याच्यावर ४-३ ने मात केली. अंतिम फेरीत त्याचा सामना जपानच्या केंटो युमिया विरुद्ध झाला. पण, युमियाने अंतिम फेरीतील अटीतटीच्या लढतीत ५-४ असा विजय मिळवला. यामुळे उदितला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

२०१९ नंतर ही पहिलीच वेळ आहे की भारताला या प्रकारात सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता रवी दहिया याने २०२० ते २०२२ दरम्यान या विभागात सुवर्णपदकांची हॅटट्रिक केली होती. तर अमन सेहरावत २०२३ चा चॅम्पियन राहिला होता.

दरम्यान, अभिमन्यूने ७० किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या ली सेंगचूलचा १०-० असा धुव्वा उडवला होता. पण उपांत्यफेरीत जपानच्या योशिनोसुके ओयागीने त्याला तेवढ्याच गुणांनी पराभूत केले. त्यानंतर अभिमन्यूने कांस्यपदकाच्या लढतीत उझबेकिस्तानच्या बेगिजोन कुल्दाशेवचा ६-५ असा पराभव केला.

विकीने (९७ किलो) चीनच्या तुएरक्सुनबीके मुहेतेचा ९-६ असा पराभव केला. पण उपांत्य फेरीत त्याला कझाकस्तानच्या रिजाबेक ऐतमुखान विरुद्ध १३-० असा पराभव पत्करावा लागला. विकीने किर्गिस्तानच्या आंद्रेई अरोनोव्हला १०-१ अशा गुण फरकाने हरवून कांस्यपदक जिंकले. (Asian Wrestling Championships 2024)

रोहितला ६५ किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत जपानच्या मासानोसुके ओनोने ५-३ असे पराभूत केले. तर परविंदर सिंग ७९ किलो वजनी गटातील पात्रता फेरीत जपानच्या रयुनोसुके कामियाकडून ३-० असा पराभूत झाला.

हे ही वाचा :

 

Back to top button