WTC गुणतालिकेत मोठा बदल! न्यूझीलंडच्या पराभवानंतर समीकरण बदलले | पुढारी

WTC गुणतालिकेत मोठा बदल! न्यूझीलंडच्या पराभवानंतर समीकरण बदलले

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाने क्राइस्टचर्च कसोटीत न्यूझीलंडचा 3 गडी राखून पराभव करत दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 असा क्लीन स्वीप केला. हॅगले ओव्हल मैदानावर चौथ्या दिवशी कांगारू संघाला विजयासाठी 202 धावांची गरज होती. त्यांच्या हातात 6 विकेट शिल्लक होत्या. अशावेळी ॲलेक्स कॅरी (नाबाद 98) आणि मिचेल मार्श (80) यांच्यातील 140 धावांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाच्या विजयाच्या उंबरठ्यावर नेले. मार्श बाद झाल्यानंतर पॅट कमिन्सने नाबाद 32 धावा करत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

तत्पूर्वी, पहिल्या डावात न्यूझीलंडने 162 तर ऑस्ट्रेलियाने 256 धावा केल्या. अशाप्रकारे कांगारूंनी 94 धावांची आघाडी घेतली होती. पण त्यानंतर किवींनी आपल्या दुस-या डावात 372 धावा करून ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 279 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात कांगारूंचा डाव गडगडला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्यांनी दुसऱ्या डावात 4 बाद 77 धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी विजयासाठी ऑस्ट्रेलियला 202 धावा तर न्यूझीलंडला 6 विकेट्सची गरज होती. न्यूझीलंड संघ मजबूत स्थितीत होता. त्यातच चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली तेव्हा ऑस्ट्रेलियाने 80 धावांवर पाचवी विकेट गमावली.

मात्र त्यानंतर मिचेल मार्श आणि ॲलेक्स कॅरी यांनी सहाव्या विकेटसाठी 140 धावांची भागीदारी करून संपूर्ण सामन्याला कलाटणी दिली. पण बेन सीअर्सने किवी संघाचे पुन्हा कमबॅक केले. त्याने लागोपाठ दोन चेंडूत मार्श आणि स्टार्क यांच्या विकेट घेत सामना रोमांचक स्थितीत पोहचवला. मात्र ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने कॅरीसह धुरा सांभाळली. दोघांनी 61 धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 3 धावांची गरज होती तर कॅरीला शतकासाठी 2 धावांची गरज होती. त्यानंतर कमिन्सने चौकार मारला. यासह कांगारूंनी किवींचा 2-0 ने सुपडासाफ केला. कमिन्सने 44 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या. न्यूझीलंडकडून पदार्पणवीर बेन सियर्सने 4 विकेट घेतल्या. याशिवाय मॅट हेन्रीने 2 आणि टीम साऊथीने 1 विकेट घेतली.

या विजयासह ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले. 12 सामन्यांनंतर त्यांच्या विजयाची टक्केवारी 62.50 झाली आहे. दुसरीकडे सहा सामने खेळणा-या न्यूझीलंडची विजयाची टक्केवारी 50 झाली आहे. या संघाची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर नऊपैकी सहा सामने जिंकून भारत अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाची विजयी टक्केवारी 68.51 आहे.

Back to top button