IND vs ENG : रोहित, जडेजा फॉर्मात, सर्फराजचा झंझावात; भारत 5 बाद 326 | पुढारी

IND vs ENG : रोहित, जडेजा फॉर्मात, सर्फराजचा झंझावात; भारत 5 बाद 326

राजकोट; वृत्तसंस्था : रोहित शर्मा (131) व रवींद्र जडेजा (110*) यांच्या शतकाने भारत-इंग्लंड तिसर्‍या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. पदार्पणवीर सर्फराज खान ‘छोटा पॅकेट, बडा धमाका’ ठरला. सर्फराजने त्याचे पदार्पण सार्थ ठरवताना विक्रमी अर्धशतकी खेळी केली आणि भारताला 5 बाद 326 मजबूत स्थितीत पोहोचवले. (IND vs ENG)

इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीच्या पहिल्या दिवशी पहिल्याच सत्रात इंग्लंडने भारताचे तीन फलंदाज 33 धावांत गारद केले. रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य होता हे सिद्ध करण्याची जबाबदारी खुद्द कर्णधार रोहित शर्मावरच आली होती. रोहित शर्मानेदेखील 10 डावांचा आपला दुष्काळ संपवत 131 धावांची दणदणीत शतकी खेळी केली. त्याने जडेजासोबत 204 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर सर्फराज खानने पदार्पणातच आपला दम दाखवत 62 धावांची अर्धशतकी खेळी केली. या तीनजणांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर 5 बाद 326 धावा केल्या. (IND vs ENG)

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून (15 फेब्रुवारी) राजकोटमध्ये खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे; पण भारताची सुरुवात खुपच खराब झाली. पहिल्या दिवशी पहिल्या अर्धा तासाच्या आत मार्क वूडने भारताला दोन मोठे धक्के दिले. त्याने आधी यशस्वी जैस्वालला 10 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. नंतर शुभमन गिलला शुन्यावर आऊट केले.

दुसरा कसोटी सामना खेळणारा रजत पाटीदारही लवकर आऊट झाला, त्याला टॉम हार्टलीने बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे पहिल्या तासातच भारताची अवस्था 3 बाद 33 अशी हलाकीची झाली; पण त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी डाव सावरला. उपहारापर्यंत इंग्लंडला चौथे यश मिळू न देता भारताने पहिल्या डावात तीन गडी गमावून 93 धावा केल्या होत्या.

दुसर्‍या सत्रात भारताने 27 षटकांत एकही विकेट न गमावता 92 धावा केल्या. या संपूर्ण सत्रात फलंदाजी करताना भारताने एकही विकेट न गमावण्याची तीन कसोटी सामन्यांमध्ये ही पहिलीच वेळ आहे. चहापानाच्या वेळेपर्यंत भारताने तीन गडी गमावून 185 धावा केल्या.

चहापानाच्या ब्रेकनंतर दुसर्‍या चेंडूवर कर्णधार रोहित शर्माने शामदार शतक ठोकले; पण या शतकाच्या पायावर त्याला मोठी खेळी करता आली नाही. रोहित 196 चेंडूंत 14 चौकार व 3 षटकारांसह 131 धावांवर झेल बाद झाला. मार्क वूडची ही तिसरी विकेट ठरली आणि त्याने चतुराईने रोहितची विकेट मिळवली. त्यानंतर पदार्पणवीर सर्फराज मैदानावर आला. (IND vs ENG)

खान कुटुंबीयांसाठी हा खूप भावनिक क्षण होता. सुरुवातीला सावध खेळ करणार्‍या सर्फराजने 48 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि भारताकडून पदार्पणातील संयुक्तपणे (हार्दिक पंड्या वि. श्रीलंका 2017) दुसरे वेगवान अर्धशतक ठरले. सर्फराज खानने पदार्पणाच्या सामन्यात 104.2 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक ठोकत भारताला 300 धावांच्या पार पोहोचवले.

सर्फराज चांगले फटके खेचताना दिसला. परंतु, त्याला 66 चेंडूंत 9 चौकार व 1 षटकारासह 62 धावांवर माघारी जावे लागले. रवींद्र जडेजा देखील शतकाजवळ पोहोचला होता. मात्र, शतकी धाव घेताना गोंधळ झाला.

त्यामुळे सर्फराज 62 धावांवर बाद झाला. यावेळी पॅव्हेलियनमध्ये बसलेला रोहित शर्मा खूपच चिडलेला दिसला. सर्फराज व जडेजा यांनी 77 धावांची भागीदारी केली. रवींद्रने पुढच्या चेंडूवर शतक पूर्ण केले. परंतु, सर्फराजच्या विकेटचे दडपण त्याच्यावर दिसले आणि त्याने शतकाचे फार सेलिब्रेशन केले नाही. दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 5 बाद 326 धावा केल्या. जडेजा 212 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकारांसह 110 धावांवर नाबाद आहे, तर कुलदीप यादव 1 धावावर नाबाद राहिला.

जडेजाच्या 3000 कसोटी धावा पूर्ण

जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये 70 सामन्यांच्या 102 डावांत 3 हजार धावा पूर्ण केल्या. यादरम्यान त्याने 20 अर्धशतके आणि 4 शतके झळकावली आहेत.

सर्फराजचे विक्रमी जलद अर्धशतक

सर्फराजने जलद अर्धशतकी खेळीसह आपल्या नावावर मोठी कामगिरी नोंदवली. त्याने 48 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह पदार्पणाच्या कसोटीत सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा तो संयुक्तरीत्या दुसरा खेळाडू ठरला. याबाबतीत त्याने 2017 मध्ये पदार्पणाच्या कसोटीत श्रीलंकेविरुद्ध 48 चेंडूंत अर्धशतक झळकावणार्‍या हार्दिक पंड्याची बरोबरी केली आहे.

रोहित शर्माचा नवा कीर्तिस्तंभ!

गांगुलीचा 17 वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त रोहित शर्माने राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीत मोठा विक्रम रचला. रोहितने शतकी खेळी साकारली. या दरम्यान, त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीचा 2008 मधील एक मोठा विक्रम मोडला. (IND vs ENG)

भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू

राजकोट कसोटीत रोहित शर्माने 66 धावा करताच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामने) सौरव गांगुलीपेक्षा जास्त धावा करणारा फलंदाज बनला आहे. आता तो भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू ठरला आहे. सौरव गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 424 सामने खेळून 18575 धावा केल्या होत्या. 2008 मध्ये त्याने क्रिकेटला अलविदा केला. म्हणजे निवृत्त होऊन जवळपास 17 वर्षे झाली आहेत.

रोहितच्या नावावर 18,510 आंतरराष्ट्रीय धावा

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 469 सामने खेळून 18,510 धावा केल्या आहेत. त्याने 56 कसोटी सामने खेळून 3,827 धावा केल्या आहेत. वन-डेमध्ये त्याने 262 सामने खेळले असून 10,709 धावा केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने 151 सामने खेळून 3,974 धावा केल्या आहेत. (IND vs ENG)

सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर

सचिन तेंडुलकरने भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 664 सामन्यांमध्ये 34,357 धावा आहेत. विराट कोहली दुसर्‍या स्थानावर आहे. कोहलीने 522 सामने खेळून 26,733 धावा केल्या आहेत. यानंतर राहुल द्रविडचा क्रमांक लागतो, त्याने 509 सामने खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24,208 धावा केल्या आहेत.

सर्वात वयस्कर शतकवीर भारतीय कर्णधार

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात शतक झळकावणारा रोहित हा सर्वात वयस्कर भारतीय कर्णधार (36 वर्षे 291 दिवस) ठरला आहे. त्याने विजय हजारे (36 वर्षे 278 दिवस) यांचा विक्रम मोडला आहे. भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार झळकावण्याच्या बाबतीतही रोहितने (212) महेंद्रसिंग धोनीला (211) मागे टाकले. हिटमॅन आता दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. या यादीत विराट कोहली (138) तिसर्‍या क्रमांकावर आहे.

लेकाची ‘टेस्ट कॅप’पाहून वडील भारावले

राजकोट कसोटीसाठी टीम इंडियाने सर्फराज आणि ध्रुव ज्युरेलचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. या दोन्ही खेळाडूंना सामन्यापूर्वी टीम इंडियाची कॅप देण्यात आली होती. सर्फराजचे वडील नौशाद खान आणि त्याची पत्नी त्याला पदार्पणाची कॅप घेताना पाहून भावूक झाले होते. टेस्ट कॅप घेऊन सर्फराज वडिलांकडे पोहोचला, हे पाहून वडील भावूक झाले आणि त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. त्यांनी टेस्ट कॅपला किस करत ती पदार्पणाची कॅप लेकाला मिळणे त्यांच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे, हे जाणवते. त्यांनी सर्फराजला मिठी मारली.

भारत ‘अ’ संघासाठी शतक झळकावले

सर्फराज भारत ‘अ’ संघाकडूनही खेळला आहे. नुकतेच त्याने इंग्लंड लायन्सविरुद्ध शतक झळकावले. 24 जानेवारीला अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात सर्फराजने 161 धावा केल्या होत्या. यापूर्वी एका डावात 55 धावा केल्या होत्या. त्याने 12 जानेवारीला इंग्लंड लायन्सविरुद्ध 96 धावांची तुफानी खेळी खेळली होती. (IND vs ENG)

सर्फराजची कारकीर्द

सर्फराज खानचा आतापर्यंतचा रेकॉर्ड खूपच चांगला आहे. त्याने प्रथम श्रेणीतही त्रिशतक झळकावले आहे. या फॉरमॅटच्या 45 सामन्यांत त्याने 3,912 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 14 शतके आणि 11 अर्धशतके केली आहेत. सर्फराजची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे, नाबाद 301 धावा. त्याने 37 लिस्ट ए सामन्यात 629 धावा केल्या आहेत. सर्फराजने 96 टी-20 सामनेही खेळले आहेत. यामध्ये 1,188 धावा केल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button