दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाला अखिल भारतीय मराठा महासंघाचा पाठिंबा | पुढारी

दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलनाला अखिल भारतीय मराठा महासंघाचा पाठिंबा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीच्या सीमेवर होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला अखिल भारतीय मराठा महासंघाने पाठिंबा दिला आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असल्यामुळे सरकारने यावर विचार करावा तसेच शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचा विचार करत तातडीने किमान आधारभूत किमतीसंदर्भात कायदा लागू करावा, अशी मागणीही केंद्र सरकारला मराठा महासंघाने केली आहे.

१३ फेब्रुवारीपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. किमान आधारभूत किमतीच्या संदर्भात कायदा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. यासह काही अन्य मागण्या देखील आहेत. आणि या सर्व मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन होत आहे. तसेच दिल्लीच्या विविध सीमा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी लवकरच शेतकरी आंदोलनाला भेट देणार आहेत. संयुक्त किसान मोर्चा आणि विविध शेतकरी संघटनांच्या वतीने होत असलेल्या आंदोलनासाठी पत्र लिहून मराठा महासंघाने पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या, त्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. संयुक्त किसान मोर्चा आणि मराठा महासंघ यांनी अनेक बाबींवर एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राज्यभरातील पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होतील. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचा विचार करत तातडीने किमान आधारभूत किमतीचा कायदा लागू करावा, अशी मागणीही मराठा महासंघाने केली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे- पाटील यांनी दिल्लीत ही माहिती दिली आहे.

हेही वाचा :

 

Back to top button