AUS vs PAK Sydney Test : सिडनी कसोटीत पाकिस्तानची अवस्था बिकट, ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर | पुढारी

AUS vs PAK Sydney Test : सिडनी कसोटीत पाकिस्तानची अवस्था बिकट, ऑस्ट्रेलिया विजयाच्या उंबरठ्यावर

पुढारी ऑनलाईन डेस्क : AUS vs PAK Sydney Test : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात पाकिस्तानी संघ पराभवाच्या उंबरठ्यावर उभा आहे. सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने दुसऱ्या डावात 67 धावांत 7 विकेट गमावल्या आहेत. यासह त्यांनी 82 धावांची आघाडी घेतली आहे. यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (6*) आणि आमेर जमाल (0*) हे क्रिजवर आहेत.

हेझलवूडचा भेदक मारा

ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 299 धावांवर ऑलआऊट झाला. पाकिस्तानकडून आमेर जमालने गोलंदाजी करताना 6 बळी घेतले. अशाप्रकारे पाकिस्तानने पहिल्या डावाच्या आधारे 14 धावांची आघाडी मिळवली. यानंतर त्यांनी दुसरा डाव खेळण्यास सुरुवात केली, पण मोठी आघाडी मिळवण्याची त्यांची रणनिती फसली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी जबरदस्त प्रतिआक्रमण केले. त्यामुळे पाकची दुसऱ्या डावातील अवस्था खूपच बिकट झाली. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाच्या वतीने जोश हेझलवूडने पलटवार करत पाकिस्तानला दिवसा तारे दाखवले. (AUS vs PAK Sydney Test)

तिसऱ्या दिवशी 15 बळी

14 धावांची आघाडी घेऊन फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांनी शून्यावर अब्दुल्ला शफीकच्या रुपात पहिली विकेट गमावली. तर धावसंख्या 1 असताना कर्णधार शान मसूद बाद झाला. यानंतर सईम अयुब आणि बाबर आझम यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली, मात्र 58 धावसंख्या असताना अयुबची विकेट पडली. अशाप्रकारे पाकिस्तानने 67 धावांवर 3 विकेट गमावल्या. यानंतरही त्यांच्या विकेट्सची पडझड सुरूच राहिली. साजिद खान आणि आगा सलमान हे दोघेही खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. जोश हेझलवूडने 4 बळी घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. हेझलवूडने तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या षटकात तीन बळी घेतले. सिडनी कसोटीच्या तिसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाचे 8 आणि पाकिस्तानचे 7 असे एकून 15 फलंदाज बाद झाले. (AUS vs PAK Sydney Test)

रिझवान-आमेर पाकसाठी शेवटची आशा

सिडनी कसोटीत पाकिस्तानला संकटातून बाहेर यायचे असेल, तर रिझवान आणि आमेर जमाल यांना पुन्हा महत्त्वाचे योगदान द्यावे लागेल. पहिल्या डावात रिझवानने 88 तर आमेर जमालने 82 धावांची खेळी केली होती. त्यामुळे सामन्याच्या चौथ्या दिवशी पाक संघाला या जोडीकडूनच शेवटची आशा असेल.

Back to top button