गुलाबी चेंडूला बीसीसीआयचा ठेंगा? | पुढारी

गुलाबी चेंडूला बीसीसीआयचा ठेंगा?

मुंबई, वृत्तसंस्था : पिंक बॉल किंवा दिवस-रात्र कसोटी सामन्यांबाबत भारतीय क्रिकेट बोर्डाचा भ्रमनिरास झाल्याचे दिसून येत आहे. यावेळी भारताच्या देशांतर्गत हंगामात पुरुष किंवा महिला क्रिकेट संघ एकही पिंक बॉल कसोटी सामना खेळणार नाही. येथे महिला प्रीमियर लीग-2 च्या लिलावाच्या वेळी पत्रकारांशी बोलताना बीसीसीआयचे सचिव जय शहा म्हणाले की, बीसीसीआय सध्या गुलाबी चेंडूच्या कसोटी सामने चार-पाच दिवसांऐवजी दोन-तीन दिवसांमध्ये संपत आहेत, त्यामुळे आम्ही त्याच्या बाजूने नाही.

जय शहा म्हणतात, ‘गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यांसाठी आम्हाला लोकांमध्ये त्याबद्दल उत्सुकता वाढवावी लागेल. तुम्हाला आठवत असेल तर (गुलाबी चेंडू) कसोटी दोन-तीन दिवसांत संपत असे. प्रत्येकाला चार-पाच दिवस चालणारा कसोटी सामना पाहायचा असतो. एकदा का त्यांना याची सवय झाली की आम्ही आणखी गुलाबी चेंडूचे कसोटी सामने खेळवू शकू. शेवटच्या वेळी ऑस्ट्रेलियात खेळला गेला होता, तेव्हापासून कोणीही दिवस-रात्र कसोटी सामना आयोजित केलेला नाही. आमची इंग्लंडशी बोलणी सुरू आहेत, पण आम्ही ते हळूहळू करू.

‘पिंक बॉल’ टेस्टमध्ये भारताचा रेकॉर्ड…!

भारतीय पुरुष संघाने आतापर्यंत गुलाबी चेंडूने चार कसोटी सामने खेळले आहेत. तीनमध्ये विजय आणि एकात संघाचा पराभव झाला आहे. भारताची सर्वात अलीकडील गुलाबी चेंडूची कसोटी श्रीलंकेविरुद्ध बंगळूर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळली गेली, जी अवघ्या तीन दिवसांत पूर्ण झाली. भारतीय महिला संघाने 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिची एकमेव गुलाबी चेंडूची कसोटी खेळली, जी क्वीन्सलँडमध्ये अनिर्णीत राहिली.

दिवस-रात्र कसोटी सामना गुलाबी चेंडूने का खेळला जातो?

कसोटी क्रिकेट पांढर्‍या जर्सीमध्ये खेळले जाते, त्यामुळे त्यात लाल रंगाचा चेंडू वापरला जातो, जेणेकरून चेंडू सहज दिसतो. तसेच एकदिवसीय रंगीबेरंगी कपड्यांमध्ये खेळला जातो, अशा वेळी त्यात पांढरा चेंडू वापरला जातो. डे-नाईट कसोटीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये, प्रयोग म्हणून पिवळे आणि केशरी सारख्या विविध रंगांचे चेंडू वापरण्याचा प्रयत्न केला गेला, ते कॅमेरा अनुकूल नव्हते. कॅमेरामनना ते टिपता आले नाही, त्यामुळे सर्वांच्या संमतीने गुलाबी रंग निवडण्यात आला.

Back to top button