IND vs BAN : बांगलादेशने भारताला दिले 257 धावांचे लक्ष्य, हसन-लिटनचे अर्धशतक | पुढारी

IND vs BAN : बांगलादेशने भारताला दिले 257 धावांचे लक्ष्य, हसन-लिटनचे अर्धशतक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने आठ गडी गमावून 256 धावा केल्या. याचबरोबर वनडे वर्ल्ड कपमध्ये सलग चौथा विजय मिळवण्यासाठी टीम इंडियासमोर 257 धावांचे लक्ष्य आहे. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक 66 धावा केल्या. तर तनजीद हसनने 51 धावांची खेळी केली. महमुदुल्लाहने 46 आणि मुशफिकुर रहीमने 38 धावांचे योगदान दिल्याने बांगलादेशची धावसंख्या 250 च्या पुढे नेली. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन बळी घेतले. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. (IND vs BAN)

पहिल्या डावात काय घडले?

बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन दुखापतीमुळे हा सामना खेळू शकला नाही. त्याच्या जागी संघाचे नेतृत्व करणाऱ्या नझमुल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तनजीद हसन आणि लिटन दास यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये 63 धावा जोडल्या. बांगलादेशची पहिली विकेट 93 धावांवर पडली. तंजिद 43 चेंडूत 51 धावा करून बाद झाला. कुलदीप यादवने त्याला पायचीत केले. यानंतर कर्णधार नजमुल आठ धावा करून जडेजाचा बळी ठरला. महेदी हसनला तीन धावांवर सिराजने बाद केले. यानंतर लिटन दासही 66 धावा करून जडेजाचा बळी ठरला. (IND vs BAN)

पहिली विकेट 93 धावांवर गमावलेल्या बांगलादेशची अवस्था 4 बाद 137 अशी झाली. यानंतर मुशफिकूर रहीमने तौहीद हृदयॉयसह डावाची धुरा सांभाळली. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली. शार्दुलने 16 धावांवर तौहीदला बाद केले. रहीमही 38 धावा करून बुमराहचा बळी ठरला. अखेरीस महमुदुल्लाहने 36 चेंडूत 46 धावा करत संघाची धावसंख्या 250 धावांच्या जवळ नेली. शेवटच्या षटकात बुमराहने महमुदुल्लाहला अर्धशतक करू दिले नाही आणि त्याला शानदार यॉर्करवर त्याचा त्रिफळा उडवला. शरीफुलने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत बांगलादेशची धावसंख्या 256 धावांपर्यंत नेली.

हार्दिक पंड्या जखमी

या सामन्यात फक्त तीन चेंडू टाकल्यावर हार्दिक पंड्या जखमी झाला. चेंडू टाकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न करताना त्याच्या पायाच्या स्नायूंना ताण आला. यामुळे त्याला पुढे गोलंदाजी करता आली नाही. विराट कोहलीने त्याच्या ओव्हरचे उर्वरित तीन चेंडू टाकले. हार्दिकच्या दुखापतीची तीव्रता समजू शकलेली नाही, मात्र तो स्कॅनसाठी रुग्णालयात गेला असून त्याला दुसऱ्या डावातही फलंदाजीला येणे कठीण असल्याची चर्चा आहे. (IND vs BAN)

 

हेही वाचा : 

Back to top button