अफगाणिस्तानकडून राजसत्तेचा पाडाव | पुढारी

अफगाणिस्तानकडून राजसत्तेचा पाडाव

विश्वचषकाच्या रणभूमीतून : निमिष पाटगावकर

विश्वचषक चालू झाल्यापासून दहा दिवस आणि बारा सामने पार पडले, तरी खळबळ माजवणारा सामना अजून झाला नव्हता, तो अखेर स्पर्धेचा तेरावा सामना झाला. स्पर्धेच्या या तेराव्या सामन्यात अफगाणिस्तानने माजी विश्वचषक विजेत्या इंग्लंडचे तीन तेरा वाजवले आणि विश्वचषकात खळबळ माजली. स्पर्धेत खेळलेल्या आपल्या तीनपैकी दोन सामन्यांत पराभव स्वीकारून अफगाणिस्तानने इंग्लंडला गुणतक्त्यात आपल्याजवळ आणून बसवले. अफगाणिस्तानचा हा विजय अनेक अर्थाने मोठा होता. बेन स्टोक्स नाही म्हणून इंग्लिश संघ कमकुवत झाला आहे हे इंग्लडचे मत असेल, तर केवळ एकाच खेळाडूवर इतके अवलंबून असलेल्या इंग्लंडचे मग तसेही कठीण आहे.

अफगाणिस्तान हा क्रिकेटविश्वातील एकमेव संघ आहे, ज्याला कसोटीचा दर्जा आहे; पण त्याला स्वतःचे घर नाही. 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, तर अफगाणिस्तानचे स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 2021 रोजी हिरावले गेले, जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा कब्जा मिळवला. तालिबानने कब्जा मिळवताच अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंनी आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांनी आपली मातृभूमी सोडली; कारण तालिबानचे कायदे कसे असतील, हे सांगता येत नाही. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा पाडाव झाल्यावर 9 वर्षांनी 2010 मध्ये सुरू झालेले महिला क्रिकेट तालिबानने पहिले बंद केले. अफगाणिस्तान महिला क्रिकेटपटू तालिबानचे अटकसत्र वाचवून कशा तरी देशाबाहेर पडून ऑस्ट्रेलियात निर्वासित म्हणून राहत आहेत. तालिबानने पुरुषांच्या क्रिकेटला मान्यता दिली; पण तालिबानी राजवटीमुळे ना त्यांना कुठची कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप मिळते, ना कुठचा देश अफगाणिस्तानचा दौरा करतो.

अफगाणिस्तानच्या पुरुषांच्या क्रिकेटला यावेळी आधार दिला तो शेजारच्या संयुक्तअरब अमिरातने. अफगाणिस्तानच्या संघाला पाच वर्षांसाठी व्हिसा आणि आसरा द्यायचे ठरवले आणि त्याबदल्यात अफगाणिस्तान यूएईच्या संघाशी दरवर्षी एक मर्यादित षटकांची मालिका खेळेल. अरबांचा पैसा त्यांच्या सुमार दर्जाच्या क्रिकेटला अफगाणिस्तानचा अनुभव आणि अफगाणिस्तानला आसरा मिळवून द्यायच्या कामी आला. तालिबान राजवटीतील परदेशी चलन नियमनाच्या गोंधळाने अफगाणिस्तान क्रिकेटला ‘आयसीसी’कडून मिळणार्‍या त्यांच्या वाट्याचा निधी मिळायलाही अडचणी येतात. अशा या निर्वासित खेळाडूंना ना कुठच्या स्थानिक स्पर्धा खेळायला मिळतात, ना त्यांच्याकडे प्रशिक्षक एक-दोन वर्षांसाठी टिकत. आताचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांचा कार्यकाळ डिसेंबर 2022 मध्ये संपणार होता; पण विश्वचषकासाठी तो वाढवण्यात आला. तेव्हा या संघातील तरुण खेळाडूंना आधार असतो तो फक्त तीन खेळाडूंचा, तो म्हणजे राशीद खान, नबी आणि मुजी उर रेहमान यांचा. हे तिघे आज जगभरात 6 लीग खेळतात आणि तिथे मिळालेला अनुभव दुबईला परत आल्यावर आपल्या संघाबरोबर शेअर करतात. हेच त्यांचे मुख्य प्रशिक्षण. आता तुम्हाला कळेल, मी हा अफगाणिस्तानचा विजय सर्वार्थाने मोठा का म्हणत आहे ते.

क्रिकेटचे धडे जगाला देणार्‍या इंग्लंडकडे सर्व अद्ययावत सुविधा आहेत. मुख्य म्हणजे, स्वतःच्या देशात राहायचे स्वातंत्र्य आहे, सरावाला कित्येक स्पर्धांचा आधार आहे. स्वतःची मैदाने आहेत, आर्थिक स्थैर्य आहे, क्रिकेट जगातील उत्तम डेटा प्लॅटफॉर्म आणि अ‍ॅनालिटिक्स सॉफ्टवेअर आहेत किंवा थोडक्यात, आजच्या आधुनिक क्रिकेटसाठी जे लागते ते सर्व इंग्लंडकडे आहे. इंग्लिश संघाचा गेल्या वर्षांतील आलेख बघितला, तर एमसीसी कोचिंग बुक्सच्या दुनियेतून बाहेर पडून ते आता उत्तमोत्तम अ‍ॅनालिटिक्सवर प्रतिस्पर्ध्यांसाठी डावपेच रचतात. 2015 साली आपल्या गटातील दुबळ्या स्कॉटलंड आणि तेव्हाचा अफगाणिस्तान सोडून बाकी सगळ्यांकडून मार खाल्ल्यावर इंग्लंडने डेटा स्ट्रॅटेजीवर भर दिला. याची फळे त्यांना 2019 चा पन्नास षटकांचा आणि 2022 चा टी-20 विश्वचषक जिंकून मिळाली आहेत.

अशा परिपूर्ण इंग्लंडचा प्रमुख गोलंदाज वोक्सवर दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात सलामीवीर गुरबाज आणि इब्राहिम झद्रानने हल्लाबोल चढवला. 5 षटकांत 35 धावा फलकावर होत्या आणि त्यात 31 धावा वोक्सच्या 3 षटकांत लुटल्या होत्या. त्यानंतरचा हल्ला होता तो सॅम कुरेनवर. डावाच्या 9 व्या आणि कुरेनच्या दुसर्‍या षटकात गुरबाजने वीस धावा काढल्या. 13 षटकांत बिनबाद शतकी सलामी दिल्यावर अफगाणिस्तान मोठी धावसंख्या उभारणार, असे वाटत होते; पण रहमत आणि गुरबाज लागोपाठ बाद झाले. गुरबाजच्या खेळीत तो बाद व्हायला फक्त धावबाद हाच पर्याय होता; कारण कुठचाही इंग्लिश गोलंदाज त्याला धावांपासून रोखू शकला नाही. लिव्हिंगस्टोन आणि रूटने मधली षटके भरून काढल्यावर अफगाणिस्तान दोनशे- सव्वादोनशेत आटपेल, असे दिसत होते.

इक्रमने राशीद आणि मुजीबच्या साथीने अफगाणिस्तानची धावसंख्या 284 पर्यंत खेचली. मुजीबच्या एका ऑफ स्टंपवरच्या जराशा खाली राहिलेल्या चेंडूवर रूटची बॅट खाली यायच्या आत त्याचा त्रिफळा उडाला. इंग्लंड संघ सुरुवातीच्या धक्क्यांतून सावरलाच नाही. नबी, मुजीब आणि राशीदने इंग्लंडची भागीदारी होऊनच दिली नाही आणि एकेक मोहरे टिपत एका अविस्मरणीय विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानची ही लढाई इंग्लंडविरुद्ध होतीच; पण त्याआधी ती होती स्वतःच्या हलाखीच्या परिस्थितीविरुद्ध. तालिबानच्या सत्तेमुळे त्यांची ‘आयसीसी’ची पूर्णवेळ सदस्यत्वता रद्द करावी का? असाही एक मतप्रवाह होता. अफगाणिस्तानने या विजयाने सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरे दिली.

Back to top button