Gautam Gambhir : ‘…तर टीम इंडिया मोठी चूक करेल’, वर्ल्डकपपूर्वी ‘गंभीर’ भविष्यवाणी | पुढारी

Gautam Gambhir : ‘...तर टीम इंडिया मोठी चूक करेल’, वर्ल्डकपपूर्वी ‘गंभीर’ भविष्यवाणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियामध्ये (Team India) पाचव्या क्रमांकासाठी कोणत्या खेळाडूची निवड करायची हा मोठा पेच आहे. केएल राहुल (KL Rahul) गेल्या काही काळापासून भारताच्या एकदिवसीय संघात भूमिका बजावत असला तरी, इशान किशनने (Ishan Kishan) ज्या प्रकारे या क्रमांकावर मैदानात उतरून जबाबदारीने खेळ केला आहे, त्याने सर्वांनाच प्रभावित केले आहे. खरे तर, राहुलला बेंचवर बसवून पाचव्या क्रमांकावर इशानलाच संधी दिली जावी, असे अनेकांचे मत आहे.

भारतीय संघाने ‘ती’ चूक टाळली पाहिजे

स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवर चर्चा करताना भारताचे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी केएल राहुल (KL Rahul) ऐवजी इशानचा संघात समावेश करावा असे मत व्यक्त केले आहे. अगामी एकदिवसीय वर्ल्डकप संघाच्या प्लेईंग 11 मध्ये इशानला स्थान देणे गरजेचे आहे. पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी तोच फेवरिट आहे. पण तरीही त्याच्याऐवजी राहुलची प्लेईंग इलेव्हनमध्ये निवड झाल्यास ती खूप मोठी चूक असेल. भारतीय संघाने ती टाळली पाहिजे, असे परखड मत गंभीर (Gautam Gambhir) यांनी मांडले.

इशानची वनडेत सातत्यपूर्ण खेळी

गंभीर (Gautam Gambhir) पुढे म्हणाले की, ‘इशानने गेल्या काही एकदिवसीय डावांमध्ये सातत्यपूर्ण खेळी केल्या आहेत. त्याने सलग चार अर्धशतके झळकावली आहेत. सलामीवीर असो की, मधल्या फळीत त्याने संघासाठी आश्वासक कामगिरी केली आहे. त्यामुळे जेव्हा मुद्दा जेव्हा तुम्ही विश्वचषक जिंकण्याची तयारी करत असता, तेव्हा खेळाडूंची त्यांच्या नावावरून निवड होता कामा नये. सध्याचा फॉर्म लक्षात घेता संघाने निर्णय घेणे आवश्यक आहे’, असा सल्लाही त्यांनी दिला.

तर इशान, राहुल दोघेही प्लेईंग 11मध्ये

खरेतर विकेटकीपर म्हणून राहुल आणि इशानमध्ये स्पर्धा होणार आहे. मात्र ही स्पर्धा टाळण्यासाठी संघ व्यवस्थापनाने जर श्रेयस अय्यरला बेंचवर बसण्याचा निर्णय घेतल्यास या दोघांचाही प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो.

Back to top button