अल्काराझ, मेदवेदेव उपांत्य फेरीत | पुढारी

अल्काराझ, मेदवेदेव उपांत्य फेरीत

उदय बिनीवाले

लंडन :  विम्बल्डनचा एक प्रमुख दावेदार कार्लोस अल्काराझ आणि चमत्कार घडवू शकणारा तृतीय मानांकित डॅनिल मेदवेदेव अपेक्षेप्रमाणे उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत.

स्पेनच्या अल्काराजला मोनॅकोच्या हॉलगर रूनने पहिल्या सेटमध्ये टाय ब्रेकरपर्यंत झुंजविले. त्यानंतर तरुण आणि बलाढ्य अल्काराझने रूनचे कच्चे दुवे बरोबर हेरून त्याच्यावर वेगवान सर्व्हिसेसचा मारा केला आणि दुसरा सेट 6-4 असा आरामात खिशात टाकला. तिसर्‍या सेटमध्ये अल्काराझने रूनला उत्कृष्ट प्लेसिंग करून मैदानभर पळविले. परिणामी, रून 4-6 असा पराभूत होऊन अल्काराझचा उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा झाला.

दुसर्‍या उपांत्य पूर्व फेरीतील मेदवेदेव वि. अमेरिकेचा क्रिस्टोफर युबाँक्स ही लढत प्रेक्षणीय आणि तोडीस तोड झाली. 2 तास 58 मिनिटे व 5 सेटपर्यंत चाललेल्या या सामन्यात सतत चढ-उतार पाहायला मिळाले. पहिला सेट मेदवेदेवने 6-4 असा आरामात खिशात टाकला खरा, पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. युबाँक्सने तुफानी हल्ला चढवत अतिशय आक्रमक खेळ करून बघता बघता पुढच्या दोन्ही सेटवर 6-1, 6-4 असा कब्जा मिळविला. त्यामुळे मेदवेदेव काळजीत होता हे नक्की. महान खेळाडूचा संयम आणि एकाग्रता उच्च असते. ते आज अनुभवी मेदवेदेवने दाखवून दिले. त्याने युबाँक्सला चुका करायला भाग पाडले. युबाँक्सचा फाजील आत्मविश्वासही नडला. मेदवेदेवने पुढचे दोन सेट 7-5, 6-1 असे जिंकून उच्च दर्जाचे टेनिस दाखविले. विम्बल्डन उपांत्य फेरीत शुक्रवारी जोकोव्हिच वि. सिन्नर आणि अल्काराझ वि. मेदवेदेव असे सामने होतील.

Back to top button