AFG vs SCO : अफगाणिस्तानचा स्कॉटलंडवर तब्बल १३० धावांनी विजय | पुढारी

AFG vs SCO : अफगाणिस्तानचा स्कॉटलंडवर तब्बल १३० धावांनी विजय

शारजाह : पुढारी ऑनलाईन

अफगाणिस्तानने ठेवलेल्या १९१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या स्कॉटलंडची फिरकीपटू मुजीब – उर – रहमानसमोर त्रेधातिरपट उडाली. चौथे षटक टाकणाऱ्या मुजीबने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर काल्म मॅकलॉईडला शुन्यावर बाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर कायल कोईटझरला १० धावांवर बाद केले. त्यांनतर त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रिचे बेरिंग्टनला भोपळाही न फोडू देता बाद करत स्कॉटलंडची बिनबाद २८ वरुन ३ बाद २८ धावा अशी केली.

त्यानंतर नवीन – उर – हक्कने मॅथ्यू क्रॉसला शुन्यावर बाद केले. त्यामुळे ३६ धावात स्कॉटलंडचा निम्मा संघ माघारी गेला. मुजीबने चांगली फलंदाजी करत असलेल्या जॉर्ज मुनसेला ( २५ )  बाद करत आपला चौथा बळी टिपला. मुजीबनंतर राशिद खाननेही आपल्या फिरकीचे जाळे टाकत मिचेल लिस्कला बाद केले.. दरम्यान आपले शेवटचे षटक टाकणाऱ्या मुजीबने मार्क वॅटला १ धावेवर बाद करुन आपल्या पाच विकेट पूर्ण केल्या. मुजीबने ४ षटकात २० धावा देत ५ बळी टिपले.

८ षटकात ७ बाद ४५ धावा अशी लाजिरवणी परिस्थिती झालेल्या स्कॉटलंडला राशिद खानने ख्रिस ग्रेवेसला १२ धावांवर बाद करत आठवा धक्का दिला. पाठोपाठ राशिद खानने जॉश डेवीला बाद करत सामना विजयाच्या अंबरठ्यावर आणला. त्याने पुढच्याच चेंडूवर ब्रँडली वीलचा शुन्यावर त्रिफळा उडवत स्कॉटलंडचा डाव ६० धावात गुंडाळला. अफगाणिस्तानने हा सामना १३० धावांनी जिंकला.

AFG vs SCO : अफगाणिस्तानची तुफान बॅटिंग

टी २० वर्ल्डकपमध्ये ग्रुप २ मधील अफगाणिस्तान विरुद्ध स्कॉटलंडच्या ( AFG vs SCO ) सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने २० षटकात ४ बाद १९० धावा उभारल्या. अफगाणिस्तानकडून नजिबुल्लाने सर्वाधिक ५९ धावा केल्या. हजरतुल्ला झजाईने ४४ तर गुरबाजने ४६ धावांचे योगदान दिले.

नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या हजरतुल्ला झजाई आणि मोहम्मद शहजात यांनी पॉवरप्लेचा फायदा उचलत आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. या दोघांनी पॉवर प्लेमध्येच संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. मात्र साफयान शरिफने शहजातला २२ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. ( AFG vs SCO )

हेही वाचा : राहुल गांधी मोहम्मद शमी याला म्हणाले त्यांना माफ करुन टाक!

त्यानंतर झजाई आणि गुरबेजने १० व्या षटकापर्यंत अफगाणिस्तानला ८० चा टप्पा पार करुन दिला. मात्र झजाई ( ४४ ) आपले अर्धशतक पूर्ण न करताच बाद झाला. झजाईने सेट करुन दिलेली धावगती गुरबेज आणि नजिबुल्लाने पुढच्या १० षटकात कायम राखली. तिसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचत संघाला १७० धावांपर्यंत पोहचवले. मात्र अखेरची दोन षटके राहिली असताना गुरबेज ४६ धावांवर बाद झाला. तर नजिबुल्लाने आपले अर्धशतक पूर्ण करत अफगाणिस्तानला १९० धावांपर्यंत पोहचवले. तो शेवटच्या चेंडूवर ५९ धावांवर बाद झाला. स्कॉटलंडकडून साफियान शरिफने सर्वाधिक २ विकेट घेतल्या.

Back to top button