सौरव गांगुलीची सुरक्षा वाढवण्याची घोषणा, मिळणार ‘Z’ सुरक्षा | पुढारी

सौरव गांगुलीची सुरक्षा वाढवण्याची घोषणा, मिळणार 'Z' सुरक्षा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगाल सरकारने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी सरकार आता गांगुलीला झेड श्रेणीची सुरक्षा देणार आहे. नवीन सुरक्षा व्यवस्थेनुसार आता आठ ते दहा पोलिसांचा पहारा असणार आहे. Y-श्रेणी सुरक्षा असताना त्याला तीन पोलिसांचे रक्षण होते.

का वाढवली सुरक्षा ?

सुरक्षा व्यवस्था वाढवण्याबाबत गांगुलीने सरकारला कोणतीही विनंती केलेली नव्हती. बंगाल सरकारनेच सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी त्याला केंद्र सरकारच्या जवळचे मानले जात होते. सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याची ऑफरही देण्यात आली होती. मात्र त्याने ती नाकारली होती. यापूर्वी त्याला ‘Y’ श्रेणीची सुरक्षा होती. त्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी (दि. १६) सरकारने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला. बंगाल सरकारच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “व्हीव्हीआयपी सुरक्षा संपल्यानंतर प्रोटोकॉलनुसार आढावा घेण्यात आला. त्यानंतर गांगुली यांची सुरक्षा झेड श्रेणीत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.”

मंगळवारी, राज्य सचिवालयाचे प्रतिनिधी गांगुलीच्या बेहाला कार्यालयात पोहोचले, तिथे कोलकाता पोलिस मुख्यालय लालबाजार आणि स्थानिक पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. “गांगुली सध्या दिल्ली कॅपिटल्स संघासोबत आहे. २१ मे रोजी कोलकाता येथे परत आल्यानंतर Z सुरक्षा देण्यात येणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्याने सांगितले.

बंगालमध्ये कोणाला कोणती सुरक्षा आहे?

पश्चिम बंगालमध्ये राज्यपाल सीव्ही आनंद बोस, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि राष्ट्रीय सचिव अभिषेक बॅनर्जी यांना झेड प्लस सुरक्षा आहे. फिरहाद हकीम आणि मोलॉय घटक या मंत्र्यांना झेड श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. भाजपच्या पश्चिम बंगालच्या अध्यक्षा सुकांता मजुमदार यांना सीआयएसएफ सुरक्षेसह झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button