LSG vs MI : लखनौने केले मुंबईचे वांदे | पुढारी

LSG vs MI : लखनौने केले मुंबईचे वांदे

लखनौ; वृत्तसंस्था :  प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी अत्यंत विजय महत्त्वाचा असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंटस्ने मुंबई इंडियन्सवर 5 धावांनी विजय मिळवला. या विजयाने लखनौ 15 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आले आहेत तर मुंबई 14 गुणांसह चौथ्या स्थानावर घसरले. या सामन्यात विजय मिळवला असता तर 16 गुणांसह मुंबईचा प्लेऑफ प्रवेश नक्की झाला असता. पण शेवटच्या षटकांत मुंबईच्या हातात आलेला विजयाचा घास मोहसिन खानने हिरावून घेतला. लखनौच्या 178 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना मुंबईच्या 172 धावा झाल्या. शेवटच्या 6 चेंडूत 11 धावांचे टार्गेट असताना मोहसिन खानने या षटकात अवघ्या 5 धावा दिल्या. कॅमेरुन ग्रीन आणि टीम डेव्हीड यांच्यासमोर युवा मोहसिनने धैर्याने गोलंदाजी करीत त्यांना एकही मोठा फटका मारून दिला नाही आणि लखनौला विजयी केले. (LSG vs MI)

रोहित शर्मा व इशान किशन यांनी मुंबईला आक्रमक सुरुवात करून देताना पॉवर प्लेमध्ये 58 धावा चोपल्या. या दोघांच्या फटकेबाजीने लखनौचे टेन्शन वाढवले. रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतलेला कृणाल गोलंदाजीसाठी मैदानावर आला. तरीही त्याला 10च्या सरासरीने सुरू असलेल्या मुंबईच्या धावसंख्येवर लगाम लावता आली नाही. रोहितने आजच्या सामन्यात ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 475 षटकारांचा टप्पा ओलांडला अन् असा पराक्रम करणारा तो पहिला आशियाई फलंदाज ठरला. (LSG vs MI)

रवी बिश्नोईने 10 व्या षटकात 90 धावांची भागीदारी तोडली. रोहित 25 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 37 धावांवर झेलबाद झाला. इशानने 34 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. बिश्नोईने पुढच्या षटकात इशान किशनची विकेट मिळवून दिली. इशान 39 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकार खेचून 59 धावांवर झेलबाद झाला. मुंबईची सर्व भिस्त सूर्यकुमार यादववर होती आणि त्याचाच खेळ पाहण्यासाठी चाहते स्टेडियमवर आले होते. पण, यश ठाकूरच्या गोलंदाजीवर सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न फसला अन् 7 धावांवर त्याचा दांडी उडाली. सूर्या मैदानावर तसाच बसून राहिला अन् मुंबईचे चाहते हादरले. मुंबईने 15 षटकांत 3 बाद 125 धावा केल्या आणि त्यांना शेवटच्या पाच षटकांत 53 धावा करायच्या होत्या. यानंतर नेहल वढेरा 20 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. विष्णू विनोद 2 धावांवर तंबूत परतला.

शेवटच्या 12 चेंडूंत 30 धावांचे लक्ष्य उरले असताना नवीन उल हकच्या या षटकांत दोन षटकारांसह टिम डेव्हीडने 19 धावा चोपल्या. त्यामुळे शेवटच्या 6 चेंडूंत 11 धावांचे टार्गेट उरले. ज्यावेळी मुंबई विजय होईल असे वाटत असताना मोहसिन खानने या षटकात अवघ्या 5 धावा दिल्या. कॅमेरुन ग्रीन आणि टीम डेव्हीड यांच्यासमोर युवा मोहसिनने धैर्याने गोलंदाजी करीत त्यांना एकही मोठा फटका मारून दिला नाही.

तत्पूर्वी, मार्कस स्टॉयनिसने केलेल्या झंझावाती 89 धावांच्या जोरावर लखनौ सुपर जायंटस्ने मुंबई इंडियन्सविरुद्ध 3 बाद 177 धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी लखनौच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना झटपट माघारी पाठवले होते. परंतु स्टॉयनिस व पंड्या जोडी खेळपट्टीवर शड्डू ठोकून उभी राहिली आणि 82 धावांची भागीदारी करून मॅच फिरवली. 49 धावांवर असताना पंड्या रिटायर्ड हर्ट झाला अन् निकोलस पूरनला अखेरच्या चार षटकांत मोठी धावसंख्या उभी करण्याची संधी दिली. स्टॉयनिस व पूरन यांनी पंड्याचा हा डाव यशस्वी ठरवताना शेवटच्या 3 षटकांत 54 धावा ठोकून मुंबई इंडियन्ससमोर तगडे लक्ष्य ठेवले.

हेही वाचा;

Back to top button