Shubman Gill Record : गिलने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ खास विक्रम! | पुढारी

Shubman Gill Record : गिलने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ खास विक्रम!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shubman Gill Broke Sachin Tendulkar’s Record : गुजरात टायटन्सचा स्टार फलंदाज शुभमन गिलने 15 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (SRH) खेळल्या गेलेल्या सामन्यात आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने 58 चेंडूत 13 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 101 धावा फटकावल्या. तत्पूर्वी त्याने एकही षटकार न मारता अवघ्या 22 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने अनुभवी सचिन तेंडुलकरचा एक खास विक्रमही मोडीत काढला.

खरं तर, षटकार न मारता सर्वात जलद अर्धशतक पूर्ण करणारा गिल (Shubman Gill) आयपीएल इतिहासातील पहिला फलंदाज ठरला. गिलने केवळ 22 चेंडूंत 9 चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. गिलच्या आधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.

आयपीएल 2010 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) तत्कालीन दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाविरुद्धच्या सामन्यात षटकार न मारता 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. आता गुजरात टायटन्सचा फलंदाज गिलने (Shubman Gill) हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

दरम्यान, गुजरात टायटन्सकडून (Gujrat Taitans) शतक झळकावणारा गिल हा पहिला फलंदाज ठरला. त्याने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत खेळलेल्या 13 सामन्यांमध्ये 48 च्या सरासरीने आणि 146.19 च्या स्ट्राइक रेटने 576 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एका शतकाशिवाय 4 अर्धशतकेही झळकली आहेत.

गेल्या हंगामात सर्वाधिक धावा

गिलने (Shubman Gill) आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये 500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर मागील हंगामात म्हणजेच आयपीएल 2022 मध्ये तो या आकड्याला स्पर्श करू शकला नव्हता. त्यावेळी त्याने 16 सामन्यांत 34.50 च्या सरासरीने आणि 132.33 च्या स्ट्राइक रेटने 483 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने चार अर्धशतके झळकावली होती. त्याचवेळी संपूर्ण हंगामात त्याच्या बॅटमधून एकूण 51 चौकार आणि 11 षटकार आले होते.

Back to top button