Harry brook : हॅरी ब्रुकला संघातून वगळण्याची मागणी | पुढारी

Harry brook : हॅरी ब्रुकला संघातून वगळण्याची मागणी

हैदराबाद; वृत्तसंस्था :  कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने गुरुवारी झालेल्या आयपीएल सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा 5 धावांनी पराभव केला. खराब फलंदाजीमुळे सनरायजर्स हैदराबाद संघाने जिंकता येणारा सामना विचित्र पद्धतीने गमावला. सनरायजर्स हैदराबादच्या पराभवामागे त्यांचा हॅरी ब्रुक हा खेळाडू सर्वात मोठा खलनायक ठरल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे. या खेळाडूला ताबडतोब सनरायजर्स हैदराबाद संघातून वगळण्यात यावे, अशी मागणी आता क्रिकेटचे जाणकार आणि चाहत्यांकडून केली जात आहे. (Harry brook)

कोलकाता विरुद्धच्या फ्लॉप शो मुळे सनरायजर्स हैदराबाद संघाने ब्रुकवर खर्च केलेले 13.25 कोटी रुपये म्हणजे मोठी चूक असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. सनरायजर्स हैदराबाद संघाने 13.25 कोटी रुपये खर्च करून इंग्लंडचा स्फोटक फलंदाज हॅरी ब्रुकचा 2023 हंगामासाठी आपल्या संघात समावेश केला होता; परंतु या फलंदाजाची कामगिरी 20 लाखांच्या खेळाडूइतकीही प्रभावी दिसली नाही, असे चाहते म्हणताना दिसत आहेत. गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात हॅरी ब्रुक शून्यावर आऊट झाला, त्यानंतर त्याच्यावर टीकेचा भडिमार झाला. (Harry brook)

हॅरी ब्रुकच्या खराब फलंदाजीने सनरायजर्स हैदराबाद संघाचे चाहतेही संतापले. गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा स्फोटक फलंदाज हॅरी ब्रुक शून्यावर आऊट झाल्यानंतर टीकेला सामोरा गेला. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने हॅरी ब्रुकला सनरायजर्स हैदराबाद संघातून वगळण्याची मागणी केली असून त्याऐवजी न्यूझीलंडचा झंझावाती फलंदाज ग्लेन फिलिप्सला मधल्या फळीत संधी देण्याची मागणी केली.

गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात हॅरी ब्रुकने 4 चेंडूंचा सामना केला आणि शून्यावर बाद झाला. ब्रेट ली म्हणाला, ‘हॅरी ब्रुक हा चांगला खेळाडू असून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. हॅरी ब्रुकनेही आयपीएल 2023 मध्ये शतक झळकावले आहे. कदाचित काही सामन्यांमध्ये हॅरी ब्रुकच्या जागी आणखी कोणाला तरी आणावे. ब्रुकसमोर कोणीही चालत नाही. तो स्फोटक खेळाडू आहे, पण सध्या तो योग्य मानसिकतेत नाही. हॅरी ब्रुक आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. आयपीएल 2023 च्या 9 सामन्यांमध्ये हॅरी ब्रुकने 20.38 च्या खराब सरासरीने फक्त 163 धावा केल्या आहेत. अशा वेळी त्याला संघातून बाहेर हकला व दुसर्‍यांना संधी द्या.

हेही वाचा;

Back to top button