रोहित शर्मा याला विजयानंतरही भेडसावतेय गोलंदाजीची चिंता | पुढारी

रोहित शर्मा याला विजयानंतरही भेडसावतेय गोलंदाजीची चिंता

मोहाली : विजयासाठी 215 धावांचे कडवे आव्हान असतानाही मुंबई इंडियन्सने धावांचा यशस्वी पाठलाग केल्याने ही दिलासा देणारी बाब ठरली. मात्र, कर्णधार रोहित शर्माने यानंतरही आपण संघाच्या कामगिरीवर पूर्ण समाधानी नसल्याचे नमूद केले. गोलंदाजीत अद्याप बर्‍याच सुधारणा कराव्या लागतील, असे रोहित याप्रसंगी म्हणाला. मुंबई इंडियन्सने मागील 4 सामन्यांत 200 पेक्षा अधिक धावांची लयलूट करू दिली असून याचा संघाला फटका बसत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर रोहित शर्मा बोलत होता. मुंबईला यंदा गोलंदाजीच्या आघाडीवर अनुभवाची उणीव जाणवत असून जोफ्रा आर्चर पूर्ण तंदुरुस्त नाही, यामुळे बरीच समीकरणे बिघडून गेली आहेत.

या पार्श्वभूमीवर रोहित म्हणाला, ‘विशेषत: मधल्या षटकात आम्हाला अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. या टप्प्यात होत असलेली धावांची आतषबाजी रोखली तर बरेच काही साध्य करता येईल. या द़ृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे.’ टी-20 क्रिकेट प्रकाराला नव्याने सुरुवात झाली, त्यावेळी 140 ते 150 ही विजयासाठी पुरेशी धावसंख्या असायची. पण, आता ही धावसंख्या विजयासाठी तोकडी पडते, ही वस्तुस्थिती आहे. एक जादा फलंदाज देखील आता खूप काही चित्र बदलून टाकतो. आयपीएलमध्ये आता सरासरी धावसंख्या 180 इतकी झाली आहे, हे मला जाणवते, असे रोहितने येथे सांगितले.

सूर्यकुमार यादवची 31 चेंडूंतील 66 धावांची खेळी लक्षवेधी होती. पण, या खेळीचे मला फारसे आश्चर्य वाटत नाही. मागील अनेक वर्षे सूर्यकुमार याच तडफेने खेळत आहे. यष्टीच्या जवळून खेळणे, उत्तुंग फटके लगावणे हा त्याच्यासाठी जणू डाव्या हातचा मळ आहे. सूर्यकुमार व किशन या दोघांनीही उत्तम फलंदाजी केली आणि अंतिम टप्प्यात टीम डेव्हिड व तिलक वर्मा यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण करणे तितकेच महत्त्वाचे होते. निकालाची चिंता न करता खेळल्यास मार्गातील सर्व अडथळे दूर होतात, यावर आमचा विश्वास आहे, याचा रोहितने पुढे उल्लेख केला.

इशान किशनच्या 41 चेंडूंतील 75 धावांची खेळीची देखील रोहितने मुक्तकंठाने प्रशंसा केली. इशान किशन छोट्या चणीचा आहे. मात्र, त्याच्या फटक्यात अफाट ताकद असते. तो सराव सत्रात सातत्याने फटके घोटवतो आणि याचा त्याला फलंदाजीत लाभ होत आला आहे, असे रोहित शर्मा शेवटी म्हणाला.

पंजाबविरुद्ध लढतीत मुंबईने फलंदाजीत जोरदार करिश्मा साकारला व याच बळावर विजय नोंदविला होता. सामन्यात इशान किशन (41 चेंडूंत 75), सूर्यकुमार यादव (31 चेंडूंत 66) यांची 116 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी व तिलक वर्माच्या (10 चेंडूंत नाबाद 26) चौफेर फटकेबाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने 6 गडी व 7 चेंडू राखून सनसनाटी विजय प्राप्त केला. पंजाबला या सामन्यात 3 बाद 214 धावांचा डोंगर रचल्यानंतरही पराभवाला सामोरे जावे लागणे धक्कादायक ठरले होते.

Back to top button